सातारा : जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील चितळी गावचे सुपुत्र, स्वर्गीय माजी सैनिक रणजीत निकम यांच्यावर धारदार शस्त्राने झालेल्या भ्याड हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ मंगळवार, दि. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे ‘सैनिक निषेध मोर्चा’ काढण्यात आला.
या मोर्चाद्वारे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुख यांना निवेदन देण्यात आले, रणजित निकम यांच्या हल्लेखोरांना कठोर फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच फरार आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. स्वर्गीय निकम यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, ही मोर्चामागील प्रमुख भूमिका असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.यावेळी सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील माजी सैनिक संघटना, पदाधिकारी, भारतीय सैन्य दलातील आजी-माजी सैनिक, पॅरा मिलिटरी फोर्सचे सदस्य, शहीद जवानांचे कुटुंबीय तसेच सैनिक कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.मोर्चात सहभागी होणाऱ्यांनी रेजिमेंट कॅप, संघटनेची कॅप, जॅकेट व मेडल परिधान करून उपस्थित लावून निषेध नोंदवला.
या संदर्भात माजी सैनिक तथा जिल्हाध्यक्ष व राज्य उपाध्यक्ष, सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्याचे प्रशांत कदम यांनी सांगितले की, “अभी नहीं तो कभी नहीं” या भूमिकेतून हा मोर्चा काढण्यात आला असून, न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरू राहणार आहे.दरम्यान, या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण असून, आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.