महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम कोयना विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या मांघर ते दुधगाव रस्त्याची जोरदार मागणी सध्या उफाळून आली आहे. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक दृष्टिकोनातून ही रस्त्याची योजना एक मैलाचा दगड ठरू शकते, असा ठाम विश्वास या भागातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुलदिप शिवराम यादव यांनी व्यक्त केला आहे.
सध्याची विदारक स्थिती – ४५ किमीचा खडतर प्रवास
सध्या दुधगावसह कोयना भागातील ग्रामस्थांना महाबळेश्वर गाठण्यासाठी कुंभरोशी मार्गे आंबेनळी घाटातून जवळपास ४५ किमीचा अवघड व धोकादायक प्रवास करावा लागतो. अरुंद, खडबडीत आणि दरड कोसळण्याच्या धोक्याने भरलेला हा मार्ग पावसाळ्यात कायम अधिकच भयानक बनतो. यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण, रुग्णांचे प्राण, शेतकऱ्यांचे उत्पादन आणि नोकरदारांचे दैनंदिन जीवन अडचणीत येते.
डॉ. यादव म्हणतात, "रोजच्या प्रवासाचा खर्च, वेळ आणि मानसिक त्रास सामान्य नागरिक सहन करतो आहे, ही शोकांतिका आहे."
मांघर ते दुधगाव नवीन रस्ता – विकासाचा राजमार्ग
डॉ. यादव यांच्या मते, जर मांघरमार्गे थेट रस्ता बांधला गेला, तर महाबळेश्वर ते दुधगाव हे अंतर फक्त ११ किलोमीटर राहिल. हि योजना केवळ प्रवास सुलभ करणार नाहि, तर संपूर्ण कोयना विभागाच्या नशिबात अमूलाग्र बदल घडवून आणू शकते.
या रस्त्यामुळे मिळणाऱ्या प्रमुख फायद्यांचा आढावा:
✅Image वेळ व इंधनात बचत – प्रवासाचा कालावधी आणि खर्च मोठ्या प्रमाणात कमी.
✅Image ४० हून अधिक गावांना थेट महाबळेश्वरशी जोडणी.
✅Image गंभीर रुग्णांना 'गोल्डन अवर'मध्ये उपचाराची सोय.
✅Image विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि वेळेत शाळा गाठण्याची सुविधा.
✅Image शेतीमाल, दूध व लघुउद्योगांना बाजारपेठेपर्यंत सोपा पोहच.
✅Image पर्यटन आणि रोजगारवाढीस चालना.
केवळ 'आश्वासने' नको, आता 'कृती' हवी!
या मागणीसाठी डॉ. कुलदीप यादव आणि या भागातील ग्रामिण जनता मागील 20 वर्षांपासून सातत्याने प्रशासन दरबारी पाठपुरावा करत आहेत. निवेदने, पत्रव्यवहार, चर्चांचा वर्षानुवर्षे ओघ सुरू असतानाही अद्यापही केवळ आश्वासनांवरच भर असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
> “हा रस्ता कोयनेच्या जनतेचा मूलभूत हक्क आहे. शासनाने सर्व आवश्यक त्या परवानग्या सहित तातडीने कार्यवाही करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी,”
– डॉ. यादव
स्थानिकांचा वाढता रोष आणि पाठिंबा – प्रशासनाकडून ठोस अंमल बजावणीची अपेक्षा.
या मागणीला आता स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी, शिक्षक, व्यावसायिक, युवक वर्ग यांचा मोठा पाठिंबा लाभत आहे. कोयना विभागाच्या विकासासाठी हिच योग्य वेळ आहे, कारण उपमुख्यमंत्री शिंदे साहेब कॅबिनेट मंत्री मकरंद पाटिल, खासदार उदयनराजे भोसले अजुन एक खासदार नितीनकाका पाटिल इतके लोकप्रिय आणि सक्षम लोकप्रतिनिधी असतांना या दुर्गम, डोंगरी आणि अतीपावसाळी भागातील रस्ते-दवाखाने असे कित्येक मुलभूत विषयांसाठी अजुन किती वर्षे वाट पहायची ? असा नागरीकांचा रोष आहे.
शासन व प्रशासनाने आतातरी स्वतः याची गंभीर दखल घेत रस्त्याच्या कामाची तात्काळ सुरुवात करावी, अशी जोरदार मागणी आता होऊ लागली आहे.