सांडवली रस्त्यावरील दोन पुलांसाठी ९ कोटी ६६ लाख; ना. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; दळणवळण सुरक्षित आणि सुकर होणार

by Team Satara Today | published on : 12 December 2025


सातारा : दुर्गम, डोंगराळ भागातील दळणवळण अधिक सुकर, सुरक्षित आणि निर्धोक होण्यासाठी विविध रस्त्यांवरील पुलांच्या बांधकामाला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्राधान्य दिले आहे. सातारा तालुक्यातील प्रजिमा २९ ते सांडवली रस्त्यावर नवीन दोन पूल बांधण्यासाठी ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यातून ९ कोटी ६६ लाख ७३ हजार रुपये निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. 

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून हा निधी मंजूर करण्यात आला असून प्रमुख जिल्हा मार्ग २९ ते सांडवली या रस्त्यावर सा.क्र. ३/९९० येथील पुलाच्या बांधकामासाठी ४ कोटी ४७ लाख ४४ हजार आणि सा.क्र. ५/२५० येथील पुलाच्या बांधकामासाठी ५ कोटी १९ लाख २९ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे. सांडवली रस्त्यावर पावसाळ्यात पांगारे तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तसेच अतिवृष्टीमुळे येथील रस्ता वारंवार खचणे, रस्त्याची पडझड होणे आदी घटना घडून दळणवळण ठप्प होणे तसेच सांडवली व भागातील गावांचा संपर्क तुटणे, या प्रकारामुळे येथील जनजीवन विस्कळीत होऊन ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत होती. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधित ठिकाणी पूल बांधण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आता निधी मंजूर झाला असून या भागातील ग्रामस्थांची गैरसोय कायमची दूर होणार आहे. 

दरम्यान, मंजूर कामांची निविदा प्रक्रिया व इतर शासकीय सोपस्कार तातडीने पूर्ण करा, मंजूर काम तात्काळ सुरु करून काम दर्जेदार करा तसेच वेळेत पूर्ण करा, अशा सूचना ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील–चाकूरकर यांचे निधन; लातूरसह राज्यात शोककळा
पुढील बातमी
दिव्यांग बांधवांनी रोखला जिल्हाधिकारी कार्यालयाचा मार्ग; अचानक आंदोलनामुळे वाहतुकीची कोंडी, शाहूपुरी पोलिसांना मध्यस्थी करण्याची वेळ

संबंधित बातम्या