सातारा, दि. 15 : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्यावतीने सातारा शहरात हुतात्मा उद्यान ते पोवई नाकामार्गे जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारापर्यंत सोमवारी भव्य मोर्चा काढण्यात आला. प्रलंबित मागण्यांची दखल घेतली जात नसल्याने, कर्मचार्यांनी जोरदार निदर्शने केली. ग्रामविकास मंत्र्यांच्या वेळकाढूपणाच्या धोरणाचा यावेळी निषेध करण्यात आला. सरकारने या मागण्याची दखल न घेतल्यास 8 ऑक्टोबर रोजी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
महासंघाचे राज्य अध्यक्ष तानाजी ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. शिवतीर्थावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या मोर्चात साडेपाचशेहून अधिक ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते. ग्रामपंचायत कर्मचार्यांना वेतनश्रेणी लागू करणे, वेतन अनुदानासाठी असलेली करवसुली व उत्पन्नाची अट कायमची रद्द करणे, ऑगस्ट 2020 ते मार्च 2022 पर्यंतची फरकाची सर्व रक्कम अदा करणे, ऑनलाइन वेतन प्रणाली, आकृतीबंधात सुधारणा, ग्रॅच्युइटीची मर्यादा वाढवणे, पेन्शन, जिल्हा परिषद अंतर्गत दहा टक्के आरक्षणातून रिक्त पदांची भरती इत्यादी मागण्या महासंघाने केल्या आहेत.
त्याबाबत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना वेळोवेळी निवेदने देण्यात आली आहेत. ग्रामविकास मंत्र्यांबरोबर बैठक लावण्याचे आश्वासन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिले होते. मात्र, गेल्या सात दिवसांपासून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने कर्मचार्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी कर्मचार्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.