सातारा : सातारा जिल्हा परिषदेअंतर्गत गट क आणि ड संवर्गातील कर्मचार्यांची सर्वसाधारण बदली प्रक्रिया सुरू आहे. बदल्या पारदर्शक आणि नि:पक्षपाती होण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. यामुळे चुकीची कागदपत्रे सादर करून फायदा घेणार्यांवर थेट कारवाईच होणार आहे. यासाठी संकेतस्थळावर तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेअंतर्गत दरवर्षी गट क आणि ड संवर्गातील बदली प्रक्रिया पार पडते. यंदाही ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. या बदली प्रक्रियेमध्ये बनावट कागदपत्रे तयार करून चुकीच्या पद्धतीने बदलीचा फायदा घेण्यात येतो. तसेच दिशाभूल होणारी माहिती कर्मचारी सादर करतात. याबाबत विविध माध्यमातून तक्रारी प्राप्त होत असतात. या तक्रारींची चौकशी करण्यासाठी, बदली प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि नि:पक्षपाती होण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सीद यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आलेली आहे. यामध्ये सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आदींचा समावेश करण्यात आलेला आहे.
त्यामुळे बदलीसंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यास समितीमार्फत चौकशी करण्यात येईल. तसेच वस्तुस्थितीची पडताळणी करण्यात येणार आहे. बदली प्रक्रियेसाठी चुकीची कागदपत्रे तयार केल्याबाबतची तक्रार जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावरही करता येणार आहे. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने बदली घेणार्यांविरोधात कारवाई करणे सोपे जाणार आहे.