सातारा : सासपडे (ता. सातारा) येथील हृदयद्रावक घटनेनंतर अवघे गाव शोकसागरात बुडाले आहे. शाळकरी मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या स्मृतीप्रित्यर्थ बोरगाव ग्रामस्थांनी कॅन्डल मार्च काढून तिला श्रद्धांजली अर्पण केली. या प्रकरणातील संशयितावर कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
या कॅन्डल मार्चमध्ये लहान मुले व मुली, महिला, तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात मेणबत्त्या घेऊन गावातून शांततेने फेरी काढण्यात आली. अनेकांनी श्रद्धांजली अर्पण करत संशयितास कठोर शिक्षा व्हावी, अशी तीव्र भावना व्यक्त केली. मुलीला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत ग्रामस्थांनी आपला संताप आणि व्यथा व्यक्त केली. या कॅन्डल मार्च व श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन रामेश्वर सामाजिक विकास प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले. पीडित कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.