सातारा : प्रभाग क्रमांक 20 आणि 21 या दोन प्रभागात घंटागाडी वेळेवर येत नसून मुकादम खवळे यांचे स्वच्छता प्रक्रियेवर नियंत्रण नाही. त्यामुळे येथील नागरिकांना सार्वजनिक अनारोग्याला सामोरे जावे लागत आहे. येथील मुकादम तात्काळ बदलावा आणि स्वच्छतेची व्यवस्था करावी अन्यथा आपल्या घरासमोर येथील कचरा उचलून टाकला जाईल, असा इशारा येथील माजी नगरसेविका आशा पंडित यांनी दिला आहे.
या प्रभागातील नागरिकांनी आशा पंडित यांच्या माध्यमातून सातारा नगरपालिकेचे प्रशासक मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना निवेदन सादर केले आहे. गेल्या काही महिन्यापासून या प्रभागात घंटागाडी वेळोवेळी आली तरी कचरा संकलन व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात नागरिकांनी आरोग्य विभाग प्रमुख राकेश गलीयल यांच्याकडे वेळोवेळी तोंडी व लेखी तक्रारी केल्या होत्या .प्रभागाच्या काही भागातील कचरा अजिबात उचलला जात नसल्याची ओरड कायम आहे .त्यामुळे या प्रभागांना कचऱ्यामुळे अक्षरशः अवकळा आली आहे.
येथील मुकादम खवळे यांचे कचरा संकलनावर अजिबात लक्ष नसल्याच्या तक्रारी अर्जाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत .सातारा पालिकेचे प्रशासक व आरोग्य विभागाचे अधिकारी गलीयल यांनी तात्काळ या मुकादम संदर्भात निर्णय घ्यावा, अशी मागणी असतानाही अद्याप त्या संदर्भात कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे येथील नागरिकांनी प्रभागातील कचरा मुख्याधिकारी व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दारासमोर टाकून कचऱ्याची होळी करणार असून तेथे बोंब मारणार असल्याचा इशारा दिला आहे.