सातारा : ध्वनी प्रदूषणाच्या वाढत्या समस्येवर नियंत्रण आणण्यासाठी साताऱ्यातील ज्येष्ठ नागरिक आक्रमक झाले असून, शासन दरबारी दाद मागण्यासाठी पुन्हा एकदा मोर्चा उभारण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
साताऱ्यात रविवारी ज्येष्ठ नागरिक संघर्ष समितीच्या झालेल्या ध्वनी प्रदूषण विरोधी बैठकीत गणेशोत्सवादरम्यान अनेक नागरिकांकडून आलेल्या तक्रारींचा आढावा घेण्यात आला. सदस्यांनी यानंतर येणारे नवरात्र, दिवाळी व विविध धार्मिक उत्सव या काळात ध्वनी प्रदूषणाची समस्या अधिक तीव्र होणार असल्याचे मत व्यक्त केले. त्यामुळे प्रशासनाने ठोस पावले उचलावी यासाठी शासन दरबारी मोर्चा काढण्याचे सर्वानुमते ठरले.
डीजे-डॉल्बीधारकांवर कारवाईचे अभिनंदन
दरम्यान, शाहूपुरी पोलिस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी काही डीजे-डॉल्बी धारकांवर वेळीच कारवाई केली तसेच साताऱ्यातील प्रसारमाध्यमांनी या विषयाला विशेष प्रसिद्धी दिली. त्यामुळे जनचळवळ उभारण्यात मोठी मदत झाली असल्याने बैठकीत पोलिस व माध्यमांचे आभार मानण्यात आले.
या बैठकीत विविध ज्येष्ठ नागरिक संघटनांचे प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यात अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे प्रकाश खटावकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे मदनलाल देवी, विजयराव देशपांडे, जनार्दन घाडगे गुरुजी, गोडोली अजिंक्य ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव जाधव, डॉ. अशोक पाटील (शाहूपुरी), डॉ. हेमलता हिरवे, दिलीप भोसले, श्रीकांत कांबळे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिक व सदस्यांनी आपले विचार मांडले.
प्रशासनावर दबाव आणण्यासाठी मोर्चा
या बैठकीतील चर्चेत ध्वनी प्रदूषणाविरोधातील लढा अधिक तीव्र करण्यात येईल, प्रशासनावर दबाव आणण्यासाठी मोर्चा काढला जाईल, नागरिकांच्या तक्रारींचे गांभीर्याने निराकरण होईपर्यंत संघर्ष सुरू राहणार असल्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले असून त्यादृष्टीने दिशाही ठरवली आहे.