सातारा : अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवरायांच्या आग्रा सुटकेबाबत वादग्रस्त विधान केले होते. या विधानाचा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या वतीने पोवई नाका येथे निषेध करण्यात आला. आंदोलक सदस्यांनी डुकराचे जाहीर छायाचित्र झळकवून हा संताप व्यक्त केला.
यावेळी कॉंग्रेस कमिटीचे प्रवक्ते अरबाज शेख म्हणाले, राहुल सोलापूरकर ज्या विचारधारेला मानतात व ज्या विचारधारेतून येतात, त्या विचारधारेने वारंवार छत्रपती शिवरायांची बदनामी केली आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवरायांच्या पराक्रमावर प्रश्न उपस्थित केले आहेत. जर सोलापूरकरांकडे कोणत्याही प्रकाराचे आपल्या वक्तव्या बाबत पुरावे असतील अथवा संदर्भित कागदपत्रे असतील तर त्यांनी ती जनतेसमोर आणावीत. अन्यथा महाराष्ट्राची माफी मागावी. नाहीतर महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या वतीने त्यांची डुकराच्या रथातून वरात काढण्यात येईल, असा इशारा शेख यांनी दिला.
यावेळी जिल्हा ओबीसी कॉंग्रेसचे अध्यक्ष जगन्नाथ कुंभार, विजय मोरे, सुरेश कुंभार, मुरलीधर पवार, अमोल शिंदे, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष शरद मोरे, जावळी तालुका ओबीसी सरचिटणीस अरुण नागर उपस्थित होते.