पेट्रोल, डिझेलचा जिल्ह्यात मुबलक साठा; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे आवाहन

by Team Satara Today | published on : 27 March 2026


सातारा  : सातारा जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेल याचा मुबलक साठा आहे तसेच 20% व्यावसायिक सिलेंडर कोटा घेऊन 80 टक्के कोटा घरगुती साठी ठेवावा असे केंद्रशासनाचे स्पष्ट निर्देश आहेत जिल्ह्यात कोणतीही टंचाईची परिस्थिती नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. टंचाईच्या कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे कळकळीचे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी आढावा बैठकीनंतर संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील,  पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील इत्यादी उपस्थित होते. जिल्ह्यात इंधनटंचाईच्या अफवांमुळे निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने स्पष्ट भूमिका घेत नागरिकांना दिलासा दिला आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा साठा पुरेसा उपलब्ध असून कोणतीही टंचाई नसल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून पेट्रोल पंपांवर गर्दी करू नये किंवा अनावश्यक साठेबाजी टाळावी, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना देसाई म्हणाले, जिल्ह्यात गॅस रिफ्युलिंग प्रक्रिया सुरळीत सुरू आहे आणि पुरवठ्यात कोणतीही अडचण नाही. काही ठिकाणी पेट्रोल-डिझेल क्रेडिटवर न देण्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या; मात्र संबंधितांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले. पेट्रोल पंप चालकांवर कोणतीही निर्बंध घालण्यात आलेले नाहीत. मात्र, नागरिकांनी गरजेपुरतेच इंधन भरावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

माध्यमांमधील काही बातम्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून साठेबाजीचे प्रकार समोर येत आहेत. अशा अफवांमुळे परिस्थिती बिघडू शकते, त्यामुळे जबाबदारीने वर्तन करावे, असे देसाई यांनी नमूद केले.

दरम्यान, पाटण महामार्गालगत असलेल्या अतिक्रमणांवर न्यायालयाचा आदेश मिळताच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच, पर्यटनस्थळांसाठी २० टक्के अतिरिक्त इंधन पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, नागरिकांनी कोणताही इंधन साठा धोकादायक पद्धतीने करू नये असे आवाहन त्यांनी केले. ग्रामीण भागातील रॉकेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठीही प्रशासनाने नियोजन केले असून कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी तयारी केली आहे. कराड चिपळूण महामार्गाच्या दुरुस्ती संदर्भात पाटणमधील धांडे लवकरच पाडण्यात येऊन त्याची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे त्यामुळे पाटण कडे जाणारा रस्ता वाहतुकी करता अवजड वाहनानकरिता बंद ठेवण्यात आला आहे, असे ते म्हणाले. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा-पुण्यातून सहा महिन्यांसाठी दोघांना तडीपार; शिरवळ पोलिसांची धडक कारवाई
पुढील बातमी
सज्जनगड येथे दरीत उडी मारून एका हॉटेल कामगाराची आत्महत्या

संबंधित बातम्या