एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन

प्रताप सरनाईकांची माहिती

by Team Satara Today | published on : 12 July 2025


मुंबई : आषाढी यात्रेनिमित्त ५२००  जादा बसेसच्या माध्यमातून एसटीने तब्बल ९ लाख  ७१ हजार ६८३ भाविक-प्रवाशांची सुरक्षित ने-आण करून त्यांना विठ्ठल दर्शन घडविले आहे. या सेवेतून एसटीला ३५ कोटी ८७ लाख ६१ हजार रुपये उत्पन्न मिळाले, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

मंत्री सरनाईक म्हणाले की, आषाढी यात्रेनिमित्त अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून श्रीक्षेत्र पंढरपूर येथे  मोठ्या संख्येने भाविक -प्रवाशी येत असतात. या भाविक-प्रवाशांना त्यांच्या गावापासून पंढरपूरपर्यंत ने-आण  करण्यासाठी एसटीने तब्बल ५ हजार २०० जादा बसेस सोडल्या होत्या. ३  ते १० जुलै दरम्यान या बसेसनी २१ हजार ४९९ फेऱ्या करून तब्बल ९ लाख ७१ हजार ६८३ भाविक - प्रवाशांची सुरक्षित ने-आण केली आहे.  यातून एसटी महामंडळाला ३५ कोटी ८७ लाख ६१ हजार रुपये इतके उत्पन्न  मिळाले आहे. जे मागील वर्षी मिळालेल्या उत्पन्नापेक्षा  ६ कोटी ९६ लाख ३ हजार रुपयांनी जास्त आहे (सन २०२४ साली आषाढी यात्रेचे एकूण उत्पन्न २८ कोटी ९१ लाख ५८ हजार रुपये इतके होते) अर्थात, एवढे चांगले उत्पन्न आणून लाखो भाविकांना सुखरुप देवदर्शन घडवून आणणारे हजारो चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी  व त्यांना मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक व अधिकारी अभिनंदन पात्र आहेत! असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले.

आषाढी यात्रेच्या काळामध्ये पंढरपूर मध्ये येणाऱ्या एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांची जेवणं अभावी गैरसोय होऊ नये, म्हणून परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्वखर्चातून ५,६ व ७ जुलै रोजी मोफत जेवण, चहा -नाश्त्याची सोय केली होती. याचा फायदा हजारो एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला. याबद्दल सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी मंत्री सरनाईक यांचे आभार मानले आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
संजय राऊतांच्या वक्तव्याची पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी उडवली टर
पुढील बातमी
भारत बंद पाठोपाठ आता महाराष्ट्र बंद

संबंधित बातम्या