सातारा : राजवाडा भाजी मंडई येथे दोन जणांनी महिलेचा विनयभंग केला असल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी पितापुत्रविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ४० वर्षीय महिला ही राजवाडा भाजी मंडई येथे भाजी विक्रीचा व्यवसाय करत असताना महिलेने तुकाराम बाकले यांना तुमच्या भाजीच्या दुकानाची उंची कमी करून आमच्या दुकानाच्या लाईनमध्ये करा असे सांगितले म्हणून तुकाराम बाकले आणि क्षितिज उर्फ पप्पू तुकाराम बाकले (रा. सातारा) यांनी याचा राग मनात धरून महिलेला शिवीगाळ करून मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. यावेळी महिलेला जवळ ओढून तिच्या कानाखाली मारण्यात आली. दोघांना समजावण्यास आलेल्या महिलेच्या पतीला देखील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून दोघांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस नाईक यादव करत आहेत.