सातारा : सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील ओगलेवाडी येथे एका भाच्याने आपल्या मामाची चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
'तू तुझ्या बायकोला का मारलेस', असा जाब विचारल्याने हा वाद झाला. मृताचे नाव शेखर उर्फ बाळू प्रकाश सुर्यवंशी असून, तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुंड होता. त्याच्यावर 19 गुन्हे दाखल होते आणि त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेनंतर संशयित आरोपी आकाश पळसे उर्फ डाबर फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी भर दुपारी ओगलेवाडीतील मुख्य चौकात बाळू सुर्यवंशी उभा असताना त्याचा भाचा आकाश पळसे तिथे आला. दोघांमध्ये काही दिवसांपासून खटके उडत होते. वादावादी सुरू असतानाच अचानक भाच्याने मामाच्या पाठीवर आणि पोटावर चाकूने सपासप वार केले. वार वर्मी लागल्याने बाळू सुर्यवंशी रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. हा प्रकार घडल्यानंतर भाचा आकाश घटनास्थळावरून पळून गेला.
स्थानिक नागरिकांनी गंभीर जखमी झालेल्या बाळू सुर्यवंशीला कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. परंतु, त्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला कृष्णा रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. बाळू सुर्यवंशी हा सराईत गुंड म्हणून ओळखला जात होता. त्याच्या हत्येची बातमी पसरताच त्याचे साथीदार उपजिल्हा रुग्णालयात जमले. यामुळे ओगलेवाडीत तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिसांनी तिथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला.
दरम्यान, मृत बाळू सूर्यवंशी यांचे वडील प्रकाश सुर्यवंशी यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मामाची हत्या करून फरार झालेल्या भाच्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळू सूर्यवंशीवर खुनाचा प्रयत्न, गर्दी मारामारी, खंडणी असे विविध प्रकारचे 19 गुन्हे दाखल होते. तसेच, त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव तयार करण्याचे कामही सुरू होते.