सातारा : निवड श्रेणीच्या प्रस्तावाला मंजुरी आदेश देण्याकामी 25 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागातील वरिष्ठ सहाय्यक वैशाली शंकर माने (वय 40) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
जिल्हा परिषदेच्या कक्ष आवारात मंगळवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. तक्रारदार सेवानिवृत्त शिक्षक असून त्यांचा 24 वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण झाला आहे. निवड श्रेणी प्रस्ताव अंतर्गत त्यांनी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी आणि अंतिम आदेश व्हावा याकरिता त्यांनी माने यांची भेट घेतली. तेव्हा या कामाकरता त्यांनी साहेबांना देण्यासाठी 25 हजार रुपये लाच मागितली. फिर्यादी यांनी सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
संबंधित महिला कर्मचाऱ्याला मंगळवारी दुपारी पंचांसमक्ष 25 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील पाटील, हवालदार प्रवीण निंबाळकर, पोलीस शिपाई माकर व महामुलकर यांनी ही कारवाई केली. सध्या लाचलुचपत विभागाचा दक्ष सप्ताह सुरु आहे. कोणत्याही लोकसेवकाने शासकीय कामासंदर्भाने लाच मागितल्यास विभागाच्या सातारा कार्यालयाकडे तात्काळ तक्रार करावी, असे आवाहन राजेश वाघमारे यांनी केले आहे.