सातारा : दि 13 सप्टेंबर 2025 रोजी आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालत मध्ये सातारा जिल्ह्यातील एकूण 1817 वादपूर्व प्रकरणे निकाली काढून एकूण वीस कोटी अडोतीस लाख दहा हजार पाचशे तेहतीस रुपयांची वसुली करण्यात आली.
वादपूर्व 15622 प्रकरणांपैकी 3205 प्रकरणे निकाली काढून एकूण रुपये चार कोटी सोळा लाख शेहचाळीस हजार तीनशे चार रुपयांची वसुली करण्यात आली. दि. 8 ते 12 सप्टेंबर या कालावधीमधील स्पेशल डाईव्ह मध्ये एकूण 840 प्रकरणे निकाली काढण्यात आली.
यामध्ये वैवाहिक वाद, तडजोडपात्र दिवाणी व फौजदारी केसेस, भूसंपादन प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाईची प्रकरणे, कर्ज, धनादेश न वटल्याची प्रकरणे इ. समावेश आहे. वादपूर्व प्रकरणात फायनान्स कंपन्या, बॅकांची कर्ज, ग्रामपंचायत मालपत्ता पाणीपट्टी कर वसुली प्रकरणे, विद्युत देयके, दूरध्वनी व भ्रमणध्वनी देयके इ. समावेश होता.
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जेष्ठ नागरिक व त्यांच्या मुलांमध्ये समेट घडून जेष्ठ नागरिक यांना त्यांच्या मुलांकडून मासिक पोटगी मिळाली. त्याचप्रमाणे मोटार अपघात प्रकरणामध्ये इंन्शुरन्स कंपनी मार्फत रुपये पन्नास लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे ब्याण्णव रक्कम देण्याचे मंजूर करण्यात आले. जिल्ह्याच्या ठिकाणी एकूण 7 आणि तालुका न्यायालयात एकूण 24 पॅनेल करण्यात आले होते. पॅनेल प्रमुख जिल्हा न्यायाधिश, वरिष्ठ दिवाणी न्यायाधिश आणि दिवाणी न्यायाधिश क स्तर यांनी काम पाहिले. प्रत्येक पॅनेलवर एक विधीज्ञ पॅनेल सदस्य म्हणून काम पाहत होते.
लोक अदालतीला चांगला प्रतिसाद मिळाला असून भविष्यात आणखी प्रबोधन आणि प्रयत्न करणार असल्याचे प्रधिकरणाचे सचिव तथा वरिष्ठ दिवाणी न्यायधीश, निना बेदरकर यांनी सांगितले.
याप्रसंगी प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश ए.एम.शेटे, विधिज्ञ, सर्व न्यायिक अधिकारी, पोलीस, विधी स्वयंसेवक आणि सर्व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.