फलटण : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस. टी.) बारामती आगाराची बारामती - कोल्हापूर एस. टी. बस (एम.एच. १४ बी टी ४९७१) फलटण कडे येत असताना फलटण पासून ४ कि.मी. अंतरावर गणेशनगर (आलगुडेवाडी), ता.फलटण गावच्या हद्दीत दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास बसच्या बॉनेट मधून अचानक धूर येत असल्याचे लक्षात येताच चालकाने तातडीने बस रस्त्याच्या डाव्या बाजूला घेऊन प्रवाशांना तातडीने खाली उतरविल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र संपूर्ण एस. टी. बस जवळपास जळून खाक झाल्याचे समजते.
बारामती आगाराची ही सीएनजी इंधनावर चालणारी एस. टी. बस (एम.एच. १४ बी टी ४९७१) घेऊन शनिवार दि. ४ रोजी दुपारी २.३० वाजता चालक नाना महादेव डाडर (बिल्ला क्रमांक ११५३४) व वाहक मोहन संपत चव्हाण (बिल्ला क्रमांक ४५१७) बारामती - कोल्हापूर मार्गावर मार्गस्थ झाले, एस. टी. बस फलटण शहराजवळ आली असता बसने पेट घेतला, त्यावेळी बस मध्ये ३१ प्रवाशी होते.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चालक/वाहक आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी बस मधील सर्व प्रवाशांना बस मधून खाली उतरविल्याने मोठा अनर्थ टळला, दरम्यान पोलिस व अग्निशमन दलाला सूचना करण्यात आल्याने पोलिस व अग्निशमन दलाचे जवान अग्निशामकासह घटनास्थळी दाखल झाले, तथापि तोपर्यंत बस पूर्णतः आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे दिसून आले.
एस. टी. पुणे विभाग व फलटण आणि बारामती आगारातील अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन प्रवाशांना आवश्यक ती मदत केली. त्यानंतर बसची पाहणी केली असून आगीचे कारणाचा शोध सुरु केला आहे.
अद्याप आगीचे कारण व बसचे किती नुकसान झाले याबाबत माहिती मिळाली नाही.
या प्रकारामुळे एस. टी. महामंडळाच्या बसेसची अवस्था व प्रवाशांची सुरक्षा हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकारामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती, घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.