बँडमास्टर सलीम मुलाणी यांचा कर्ण फाऊंडेशनतर्फे सन्मान; 25 वर्षांपासून दिव्यांग मुलांना देत असलेल्या प्रशिक्षणाची दखल

by Team Satara Today | published on : 08 December 2025


सातारा : गेल्या 25 वर्षांपासून कलाक्षेत्रात कार्यरत असलेले व दिव्यांग मुलांना बँड वादनाचे प्रशिक्षण देणार्‍या बँडमास्टर सलीम मुलाणी यांचा कर्ण फाऊंडेशनतर्फे रोटरी क्लब ऑफ सातारा कॅम्प ट्रस्ट संचलित आनंदबन विशेष मुलांचे व्यवसाय प्रशिक्षण केंद्रात शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन शिंदे फर्निचरचे संचालक, कवी, गझलकार वसंत शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

येथील कर्ण फाऊंडेशन ही संस्था सामाजिक क्षेत्रात मागील 20 वर्षांपासून कार्यरत असून आजवर हजारो गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिलेला आहे. त्याचप्रमाणे अनेकविध क्षेत्रांतही संस्थेची यशस्वी वाटचाल सुरूच आहे. याचाच एक भाग म्हणजे 3 डिसेंबर ते 8 डिसेंबर या दिव्यांग सप्ताहाचे औचित्य साधून कर्ण फाऊंडेशनने बौद्धिक अक्षम असणार्‍या विद्यार्थ्यांना बँड वादनाचे प्रशिक्षण देणार्‍या बँडमास्टर सलीम मुलाणी सत्कार केला.

यावेळी वसंत शिंदे म्हणाले, भौतिक अक्षम अशा या विशेष मुलांना बँड वादनाची कला शिकवणे ही गोष्ट सोपी नाही. सलीम मुलाणी यांनी या विशेष मुलांना बँड प्रशिक्षण देण्याचे इंद्रधनुष्य अतिशय सक्षमपणे पेलले आहे. त्यामुळे कर्ण फाऊंडेशन ने मुलाणी सरांचा केलेला सन्मान निश्चितच यथोचित आहे.

कर्ण फाऊंडेशनचे अध्यक्ष शेखर कोल्हापूरे म्हणाले, मुलाणी सर हे सन 2000 पासून ते आत्तापर्यंत म्हणजे सलग 25 वर्ष ते या दिव्यांग मुलांना प्रशिक्षण देत आहेत. ते मुलात मूल होऊन मिसळून आणि अतिशय संयमाने या मुलांना देत असलेले प्रशिक्षण मी स्वतः डोळ्याने पाहिले आहे. त्यांचा सत्कार करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.असे म्हणून त्यांनी त्यांच्या पुढील कारकीर्दी शुभेच्छा दिल्या.

सलीम मुलाणी म्हणाले, प्रशिक्षण देताना सेवा म्हणून मी करत असून त्यातून मला खूप आनंद मिळतो. या मुलांच्या चेहर्‍यावर दिसणारे समाधान हेच माझे खरे बक्षीस आहे. कर्ण फाऊंडेशन या संस्थेने माझ्या कामाची दखल घेतली त्याबद्दल मी संस्थेचा खूप ऋणी आहे.

कार्यक्रमास कर्ण फाऊंडेशनचे कुमार लोखंडे, पद्मा लोखंडे, दत्ता सांगलीकर, सिद्धी कोल्हापूरे-जाधव,सौरभ जाधव तसेच आनंदबन विशेष मुलांची शाळा व व्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे सौ. सुनिता कोल्हापुरे, तुषार मस्के, शिवभूषण कोप्पद, विशाल पवार, रवींद्र लोहार, आरती देशपांडे, रोहित माने, भाऊसाहेब ओहाळ उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा एमआयडीसी परिसरात गावठी पिस्तूल बाळगणार्‍यास अटक; पिस्तूल, जिवंत तीन काडतुसे, मोबाइल जप्त
पुढील बातमी
खटाव-माण साखर कारखान्याकडून ऊसदराचा एक रकमी हप्ता जमा - माजी आमदार प्रभाकर घार्गे; ३३०० रुपये प्रति टन दराप्रमाणे बँक खात्यात वर्ग

संबंधित बातम्या