सातारा : सातारा मध्यवर्ती एसटी आगाराच्या कर्मचाऱ्यांनी प्रलंबित आर्थिक मागण्यांच्या संदर्भाने 15 ऑक्टोबर 2025 पासून विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने हा इशारा देण्यात आला आहे . प्रभारी विभाग नियंत्रक विकास माने यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
महाराष्ट्र एसटी कामगार संघटना सातारा विभागीय सचिव अजित पिसाळ, महाराष्ट्र एसटी वर्क काँग्रेस संघटना धनाजी जाधव, विभागीय सचिव कामगार सेना पी एस फाळके, बहुजन कर्मचारी संघ महाराष्ट्र अमोल बनसोडे,महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस गणेश निकम,तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख प्रणव सावंत इत्यादी यावेळी उपस्थित होते.
एसटी महामंडळाच्या सातारा विभागातील कर्मचाऱ्यांना गेल्या दोन वर्षाचा महागाई भत्ता मिळालेला नाही त्याचबरोबर वेळोवेळी जाहीर करण्यात आलेल्या पगारवाढीचे प्रस्ताव सुद्धा राज्य शासनाच्या वतीने अद्याप पूर्ण करण्यात आलेले नाहीत. संपूर्ण राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांची जवळपास 5600 कोटी रुपयांची देणी प्रलंबित आहेत . या देणी संदर्भात वित्तमंत्री अजितदादा पवार यांच्या सोबत चर्चा होणार आहे. राज्यसरकारने एसटीला दर महिन्याला 120 कोटी रुपये वाढीव दिल्यास तोडगा निघण्याची शक्यता आहे.
मात्र अद्याप याबाबत निर्णय झालेला नाही 13 ऑक्टोबर पासून वेगवेगळ्या एसटी कामगार संघटना आंदोलनाच्या तयारीत आहेत. साताऱ्यातही सर्व कर्मचारी विभागीय कार्यासमोर धरणे आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आलेला आहे .एसटी कामगारांना साताऱ्यात प्रत्येकी 17 हजार रुपये दिवाळी भेट देण्यात यावी अशी सर्व कर्मचाऱ्यांची मागणी आहे.