कराड : कराड-विटा मार्गावर ओगलेवाडी, ता. कराड येथे रेल्वे स्टेशननजीकच्या पुलावर मंगळवारी (दि. 25) मध्यरात्री 1 च्या सुमारास कार आणि टेम्पो यांची समोरासमोर धडक होऊन, ओमकार राजेंद्र थोरात (वय 28) आणि गणेश सुरेश थोरात (वय 25, रा. ओंड, ता. कराड) हे चुलत भाऊ जागीच ठार झाले, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ऋषीकेश कुबेर थोरात (वय 28, रा. ओंड) आणि रोहन पवार (वय 25) या जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत टेम्पोचालक दिगंबर सोपान धुळे (रा. लिंबोटी, जि. नांदेड) यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात खबर दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ओमकार थोरातसह चार जण विट्याकडून कराडच्या दिशेने येत होते. त्यावेळी टेम्पो कराडकडून विट्याच्या दिशेने निघाला होता. ओगलेवाडी रेल्वे स्टेशन परिसरातील पुलावर मध्यरात्री 1 च्या या वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली.
या अपघातात कारचालक ओमकार आणि त्याचा चुलतभाऊ गणेश यांचा जागीच मृत्यू झाला. ऋषीकेश आणि रोहन हे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच कराड शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. या अपघातामुळे कराड-विटा मार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. अपघाताची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली असून, कारचालक ओमकार याच्यावर अपघातास कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.