अमित शहा यांच्या वक्तव्यानंतर जिल्ह्यातील सहकारी पक्षांना 'धडकी'

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात 'दादां'च्या राष्ट्रवादीत होणार पक्ष प्रवेशाची मांदियाळी

by Team Satara Today | published on : 29 October 2025


सातारा : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसापूर्वीच मुंबई दौऱ्यात भाजपाला कुबड्यांची आवश्यकता नाही, असे वक्तव्य करत राज्यातील स्थानिक निवडणुकीसाठी 'एकला चलो' चा कानमंत्र दिल्यामुळे त्याबाबत सातारा जिल्ह्यातील अन्य सहकारी पक्षांना 'धडकी' भरली आहे. सद्य परिस्थिती सातारा जिल्ह्यावर भाजपाचा प्रभाव असला तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मानणारा एक फार मोठा गट आहे. अजित दादांनी सत्तेत सहभागी घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यातील अनेक जण थोरल्या पवारांचा हात सोडून अजित पवार यांच्याबरोबर सत्तेत सहभागी झाले होते. याच पार्श्वभूमीवर जे पाठीमागे राहिले होते असे दिग्गज आता त्यांच्या संपर्कात असून नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांना मानणारे अनेक जण अजित दादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा असून येत्या काही महिन्यांमध्ये होणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये प्रथमच फार मोठी रंगत पाहायला मिळणार आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यामुळे नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्यांमध्ये पहिल्या टप्प्यात नगरपालिका, दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती यांच्या निवडणुका होण्याची शक्यता निर्माण झाली असून यात नगरपालिकांच्या निवडणुकीची आचारसंहिता नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकांसाठी सातारा जिल्ह्यातील इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले असल्याचे वृत्त आहे. त्यातच चार दिवसांपूर्वी मुंबई दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपाला कोणाच्याही कुबड्यांची गरज नसल्याचे सांगत अपवाद वगळता राज्यातील निवडणुका भाजप स्वबळावर लढवेल असे संकेत दिल्यामुळे राज्यासह सातारा जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. अमित शहा यांच्या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे.

सातारा जिल्ह्यामध्ये सध्या भाजप क्रमांक एकचा पक्ष समजला जात असून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, ना. श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले, ना. जयकुमार गोरे, आ. अतुल भोसले, आ. मनोज घोरपडे यांनी जिल्ह्यावर चांगली पकड घट्ट केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष तथा कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील आ. महेश शिंदे यांनीही आपली ताकत चांगलीच जिल्ह्यात लावली आहे. सातारा जिल्ह्याचा इतिहास आणि भूगोल माहित असणाऱ्या तत्कालीन पालकमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधुन बाहेर पडून सवता सुभा मांडत राज्याच्या नव्हे तर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. विधानसभा निवडणुकीत वाई- महाबळेश्वर, खंडाळा विधानसभा मतदारसंघातून मकरंद पाटील यांना तर फलटण विधान मतदार संघातून नवखा चेहरा सचिन पाटील यांना संधी देत त्यांना विधानसभेवर पाठवले. मंत्रिमंडळात मकरंद पाटील यांना मदत व पुनर्वसन मंत्रीपद देऊन त्यांची कॅबिनेट मंत्रीपदावर वर्णी लावली.तद्नंतर अत्यंत चाणाक्षपणे मकरंद पाटील यांचे छोटे बंधू नितीन पाटील यांना लोकसभेवर खासदार म्हणून काम करण्याची संधी दिली. या मिळालेल्या संधीचे सोने करत दोन्हीही पाटील बंधूंनी सातारा जिल्ह्यात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बांधणीला सुरुवात केली. गेल्या काही महिन्यात पाटील बंधुच्या पुढाकाराने जिल्ह्यात काही महत्त्वाचे पक्ष प्रवेश झाले. तद्नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सातारा जिल्ह्यातील अन्य पक्षातील काहीजण गळाला लागतात का? याची चाचपणी करून फासे टाकले. शिवसेनेचे  माजी आमदार सदाभाऊ सपकाळ यांच्यासारखे जुन्या संवगडयाच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. एकूणच जिल्ह्यामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच शरद पवार यांचे कट्टर समर्थक माजी आमदार प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने हे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा जोरदार झडू लागल्या आहेत. प्रभाकर घार्गे आणि प्रभाकर देशमुख यांच्या पक्ष प्रवेशामुळे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाला जिल्ह्यात फार मोठे बळ मिळणार असल्याचे समजले जाते. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे प्रवेश होणार असल्याचे सांगितले जात आहे. थोडक्यात सध्यातरी सातारा जिल्ह्यात भाजप पक्ष आघाडीवर असला तरी आपला पक्षही तुल्यबळ असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कृतीतून दिसून येत आहे.

खटाव- माण तालुक्याला मिळणार उर्जितअवस्था 

गत झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्याकाळी त्यांच्यावर असणाऱ्या सहकाऱ्यांना मोट बांधता न आल्यामुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. या तालुक्यात प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख हे वजनदार नेते मानले जातात. त्यांची स्वतःची अशी व्होट बँक असल्यामुळे या दोघांनी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास खटाव आणि माण या तालुक्यांत अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ऊर्जित अवस्था मिळण्यास मदत होणार असल्याचे मानले जात आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अंडी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावीत की नाही?
पुढील बातमी
दाऊदच्या ड्रग्स साम्राज्यावर मोठा धक्का; दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर एनसीबीची मोठी कारवाई

संबंधित बातम्या