सातारा : 2019 च्या आगामी निवडणुकांमध्ये इतर मागास प्रवर्गाच्या मतदारांनी सत्तेतला आपला हिस्सा आता हिसकावून घ्यायला हवा. सत्ता परिवर्तनाची चळवळ ही आता व्यापक पद्धतीने तळागाळातून राबवणे गरजेचे आहे, त्यासाठी सर्वांनी एकजुटीने कामाला लागावे, असे कळकळीचे आवाहन ओबीसी समाजाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी केले.
साताऱ्यात ओबीसी जिल्हा संघटनेच्या वतीने ओबीसी बहुजन संविधान बचाव अभियान येथील शाहू चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आयोजित केले होते त्यावेळी लक्ष्मण हाके बोलत होते. यावेळी ॲड. मंगेश ससाणे, नवनाथ वाघमारे, चंद्रकांत खंडाईत, भरत लोकरे उपस्थित होते.
हाके पुढे म्हणाले, ‘‘ओबीसी समाज आजही हक्कांसाठी झोळी घेऊन उभा आहे, ही शोकांतिका आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार ओबीसींपर्यंत पोहोचले नाहीत, त्यामुळे अन्याय सहन करण्याची वेळ आली आहे. राजसत्ता ही मागून मिळत नाही, ती हिसकावून घेण्याची हिंमत मनगटात असावी लागते. आजपर्यंत निर्णय प्रक्रियेत ओबीसींचा सहभाग नसल्याने अध्यक्षपद, वसतीगृह यांसारख्या सुविधा मिळत नाहीत.
ओबीसी चळवळ अधिक व्यापक करण्याची गरज
ओबीसी चळवळ अधिक व्यापक करण्याची गरज असून वास्तवतेची धुरा कुणीतरी स्वीकारली पाहिजे. त्यामुळे २०२९ पर्यंत ही चळवळ दिल्लीपर्यंत पोहोचवून सत्तेचा बदल घडवून आणू. ओबीसीतील भटक्या-विमुक्त समाज आजही मूलभूत गरजांपासून वंचित आहे. त्यांच्याकडे जमीन नाही, शिक्षणाची सोय नाही, मग आपण नेमक्या कोणत्या भारतात जगतो आहोत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्र मोजक्या कारखानदारांच्या हातात गेला
फुले-शाहू-आंबेडकरांचा विचारांचा महाराष्ट्र आता दिसत नाही, तर तो काही मोजक्या कारखानदारांच्या हातात गेला आहे, अशी टीकाही त्यांनी केली. मंडल आयोगाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पुढे यावे लागेल. आम्ही संविधान आणि कायद्याची भाषा बोलत असल्यामुळेच आमच्यावर विरोध होत असल्याचेही त्यांनी सांगितले.’’