सातारा : पुणे येथे झालेल्या २० व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा २०२५ मध्ये कोल्हापूर विभागीय संघाने असाधारण कामगिरी करत ७ सुवर्ण, ४ रौप्य आणि १ कांस्य पदक जिंकले आणि उपविजेतेपद पटकावले.
दि. १४ ते १९ सप्टेंबर दरम्यान झालेल्या या मेळाव्याचे आयोजन राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी), महाराष्ट्र यांनी केले होते. मेळाव्याच्या समारोप प्रसंगी राज्याच्या पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला प्रमुख पाहुण्या होत्या. त्यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. या स्पर्धेत राज्यभरातून २६ संघांनी भाग घेतला होता. उपस्थितांमध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद, वरिष्ठ अधिकारी डॉ. राजेंद्र डहाळे आणि सुधीर हिरेमठ यांचा समावेश होता.
या राज्यस्तरीय मेळाव्यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण या पाच जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांमूधन निवड करण्यात आलेल्या कोल्हापूर परिक्षेत्रीय संघातील स्पर्धकांनी सहभाग घेतला.
यामध्ये तपासामध्ये वैज्ञानिक मदत या स्पर्धा प्रकारात सपोनि अन्वर मुजावर, (जिल्हा सातारा) यांनी १ सुवर्ण पदक व १ रौप्य पदक, पोलीस फोटोग्राफी या क्रिडा प्रकारात रघुनाथ शिंदे, (जिल्हा पुणे ग्रामीण) यांनी १ सुवर्ण पदक, घातपात विरोधी तपासणी या क्रिडा प्रकारात संदीप पांडव (जिल्हा सातारा) यांनी १ सुवर्ण पदक, १ रौप्य पदक व अमोल गवळी, (जिल्हा सातारा) यांनी १ रौप्य पदक, संगणक साक्षरता या क्रिडा प्रकारामध्ये निखील जाधव (जिल्हा सातारा) यांनी २ सुवर्ण पदके, श्री. प्रसाद मांढरे (जिल्हा सोलापूर ग्रामीण) यांनी १ सुवर्ण पदक व १ कांस्य पदक, श्री. अजय सावंत (जिल्हा कोल्हापूर) यांनी १ सुवर्ण पदक तर श्वान स्पर्धा या क्रिडा प्रकारामध्ये सातारा जिल्हा पोलीस दलाकडील श्वान सूचक यांसह श्वान हस्तक श्री. दत्तात्रय चव्हाण व सचिन भोसले (जिल्हा सातारा) यांना १ सुवर्ण पदक मिळविले आहे.
यासह कॉम्युटर अवेरनेस या स्पर्धा प्रकारामध्ये ३ सुवर्ण पदके, १ रौप्य पदक व १ कांस्य पदक मिळवून कॉम्प्युटर अवेरनेस विनर ट्रॉफी पटकावली आहे. त्याचबरोबर पोलीस फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफी या स्पर्धेमध्ये फोटोग्राफी विनर ट्राफी पटकावली आहे.
सुनील फुलारी (विशेष पोलिस महानिरीक्षक, कोल्हापूर झोन), संदीप सिंग गिल (पोलीस अधीक्षक, पुणे), तुषार दोशी (पोलीस अधीक्षक १, सातारा), डॉ. वैशाली कडूकर (अतिरिक्त पोलिस अधीक्षक, सातारा), क्रांती पवार (अतिरिक्त पोलिस अधीक्षक १, सीआयडी, पुणे) आणि अतुल सबनीस (उप पोलिस अधीक्षक, गृह) यांच्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळाले आहे.