सातारा : शिवसेना ठाकरे गटाचे उप शहरप्रमुख सादिक बागवान यांनी बुधवारी सातारा पालिकेच्या प्रवेशद्वारावर आरोग्य सार्वजनिक बांधकाम विभाग व विद्युत विभाग यांच्यामध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचारी कामाचा अन्नत्याग आंदोलनाद्वारे निषेध केला आहे. सातारकर जनतेच्या पैशाची उघडपणे उधळपट्टी होत असून त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत हे आंदोलन सुरू केले आहे. विद्युत विभागाच्या अंतर्गत येणारे पथदिवे हे पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत. राजवाडा ते कमानी हौद व कमानी हौद ते शाहू चौक या दरम्यानचे दिवे बंद आहेत.
तसेच ग्रेड सेपरेटर येथील पथदिवे पूर्णतः बंद आहेत. यादोगोपाळ पेठ येथील छत्रपती प्रतापसिंह उर्फ दादा महाराज उद्यान अद्यापही सुरू झालेले नाही. या उद्यानाच्या सुशोभिकरणासाठी खर्च झालेले कोट्यवधी रुपये कुठे गेले, हा प्रश्न बागवान यांनी उपस्थित केला आहे. तसेच आरोग्य विभागाने घंटागाडीसाठी व कचरा संकलन सोयीचे व्हावे याकरिता क्यूआर कोड दिला होता. त्याचा वापर होत नाही. म्हणजेच या निविदेसाठी सुद्धा लाखो रुपये उधळण्यात आले आहेत.
सातारा पालिकेचा पैसा हा सातारकर जनतेचा पैसा आहे. या तीन कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा अद्याप हिशोब मिळालेला नाही. प्रशासक मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही त्यांनी याचे उत्तर दिलेले नाही, म्हणून हे अन्नत्याग आंदोलन अशाच तीव्र पद्धतीने सुरू राहणार असल्याचा इशारा सादिक बागवान यांनी दिला आहे.