केळघर : 26/11 च्या मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले केडंबे गावचे सुपूत्र अशोक चक्र सन्मानित शहीद तुकाराम ओंबळे यांच्या अतुलनीय पराक्रमामुळे क्रूरकर्मा दहशतवादी अजमल कसाब जिवंत सापडला व पाकिस्तानचा खरा चेहरा संपूर्ण जगापुढे आला. त्यामुळे शहीद ओंबळे यांचे हे हौतात्म्य युवा पिढीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन जावली पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी राम जगताप यांनी केले.
शहीद तुकाराम ओंबळे यांच्या 17 व्या स्मृतिदिनानिमित्त केडंबे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, पोलिस उपनिरीक्षक विजय शिंगटे, मंडलाधिकारी संतोष भोसले, तलाठी संदीप ढाकणे, हवालदार धीरज बेसके, मोहनराव कासुर्डे, रामभाऊ शेलार, शिवसेना जिल्हा सह संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे, शिवसेना संपर्कप्रमुख अंकुश कदम, सरपंच महादेव ओंबळे, राजूशेठ ओंबळे, आदिनाथ ओंबळे, बाळकृष्ण ओंबळे, बंडोपंत ओंबळे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात एकनाथ ओंबळे म्हणाले, केडंबे गावचे नाव जगाच्या पातळीवर केवळ शहीद तुकाराम ओंबळे यांच्या अतुलनीय पराक्रमामुळे गेले आहे. त्यांच्या या बलिदानाचा इतिहास युवा पिढीसाठी दीपस्तंभ ठरणार असून शहीद ओंबळे यांच्या स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच स्मारकाचे काम पूर्ण होणार आहे.
यावेळी शहीद तुकाराम ओंबळे यांच्या वीर पत्नी ताराबाई तुकाराम ओंबळे यांच्याकडून शालेय विद्यार्थ्यांना ट्रॅक सूट वाटप केले . तसेच रोहित ओंबळे यांच्यामार्फत अल्पोपहार वाटप केले. तसेच जनसेवा विकास प्रतिष्ठानमार्फत लोकशाहीर आनंदराव दानवले यांचा पोवाडा कार्यक्रम, खाऊ वाटप करण्यात आले. दत्तात्रय ओंबळे यांच्याकडून शालेय मुलांना आयडेंटी कार्ड वाटप केले. शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा यांच्यावतीने मेढा ते केडंबे दरम्यान विद्यार्थ्यांसोबत सायकल रॅली काढण्यात आली. नेहरू युवा मंडळ केडंबेचे सर्व पदाधिकारी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामस्थ, जनसेवा प्रतिष्ठान केडंबे यांनी विशेष परिश्रम घेतले.