12:06am | May 04, 2024 |
सातारा : सातारा लोकसभा निवडणुकीचे मतदान अवघ्या चार दिवसांवर येवून ठेपले आहे. जिल्ह्यात विविध पक्ष व अपक्षांसह 16 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सुमारे आठवड्यापूर्वी अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा मनुष्य हे चिन्ह बहाल केले आहे. मात्र, जिल्हा निवडणूक अधिकार्यांनी एका अपक्ष उमेदवाराला ट्रंपेट (तुतारी?) हे चिन्ह दिल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
एक तुतारी द्या मज आणुनी, फुंकेन मी ती स्वप्राणाने... असे म्हणत केशवसुतांनी मरगळलेल्या तरुणाईला सुमारे शतकभरापूर्वी साद घालत ब्रिटीशांविरोधी लढ्यामध्ये ताकदीने उतरण्याची प्रेरणा निर्माण केली होती. परंतू याच तुतारीने मात्र सातार्यामध्ये संभ्रम निर्माण केला आहे. अर्थात याला निवडणूक आयोगच जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. सातारा जिल्हा हा गेली 24 वर्षे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा बालेकिल्ला राहिलेला आहे. खा. शरद पवार यांनी कॉंग्रेसशी फारकत घेतल्यानंतर 1999 साली राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी हा स्वत:चा पक्ष काढत कॉंग्रेसलाच ललकारण्याचा प्रयत्न केला होता. याला फारसे यश आले नसले तरी स्व. यशवंतराव चव्हाणांचा वारसा सांगणार्या सातारा जिल्ह्याने मात्र, शरद पवारांच्या पाठीमागे राहण्याचा ठाम निर्णय घेतला आणि गेली 23 वर्षे राष्ट्रवादीसाठी अभेद्य असणारा हा किल्ला घरभेद्यांमुळे फुटला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बिनीच्या शिलेदारांमुळे खिंडार पडले. एकेकाळी राष्ट्रवादीतून लोकसभेची कारकीर्द सुरु करणार्या खा. उदयनराजेंनीच 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून निवडून येवूनही पंचपक्वानांनी भरलेले ताट लाथाडले, निवडून येवूनही काही महिन्यांतच राजीनामा दिला. पोटनिवडणुकीत सातारकरांनी गृहित धरणे म्हणजे काय असते, हे उदयनराजेंसह भाजपलाही दाखवून दिले. त्या पोटनिवडणुकीत उदयनराजेंचा पराभव झाला.
पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचाच उमेदवार निवडून आला. एकूणच सर्वकाही आलबेल असतानाच सत्तेच्या साठेमारीत पवारांचा सख्खा पुतण्या असणार्या अजित पवारांनीच त्यांचा हात झटकत भाजपचे कमळ हाती घेवून पवारांचे घड्याळही मनगटावर बांधले. राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने व सर्वोच्च न्यायालयाने घड्याळाचा चेंडू अजित पवारांच्या पारड्यात टाकला. परिणामी राष्ट्रवादीचे चिन्ह अटी आणि शर्तींनुसार अजित पवारांना मिळाले. गेल्या महिन्यात अठराव्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर मोठ्या महत्प्रयासानंतर सातारा लोकसभेची जागा अनपेक्षितपणे भाजपच्या पारड्यात पडली आणि अथक प्रयत्नांनंतर भाजपनेही ही उमेदवारी राज्यसभेचे खासदार उदयनराजेंना दिली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार असणार्या उदयनराजेंच्या प्रचारात भिरकीट करुन जिल्हाभर सभा गाजवणार्या आणि त्यानंतर त्यांना निवडून आणणारे शशिकांत शिंदेच या निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून उदयनराजेंच्या विरोधात शड्डू ठोकून उभे आहेत. उदयनराजे भाजपकडून कमळाच्या चिन्हावर लढत आहेत, तर शशिकांत शिंदे त्यांच्या पक्षाला निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या तुतारी वाजवणार्या मनुष्याच्या चिन्हावरुन लढत आहेत. उदयनराजे आणि शशिकांत शिंदेंमध्ये ही थेट लढत असली तरी यामध्ये सुमारे 14 हौशे, गवशे, नवशे आणि काही कच्चे लिंबूही आपले नशीब आजमावू पाहत आहेत. आठवडाभरापूर्वी निवडणूक निर्णय अधिकार्यांनी राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांच्या निवडणूक चिन्हावर शिक्कामोर्तब केला. निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) यांना तुतारी वाजवणारा मनुष्य हे चिन्ह देण्यात आले होते. मात्र, अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणारे संजय गाडे यांनाही जिल्हा निवडणूक अधिकार्यांनी तुतारी हे चिन्ह दिले असल्याने जिल्ह्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
वास्तविक संजय गाडे यांना दिलेले हे चिन्ह तुतारी आहे, की ट्रंपेट यावर जिल्ह्यातील पारा-पारांवर चर्चा सुरु आहे. संजय गाडे यांना दिलेले चिन्ह हे अनेकांनी लग्नामध्ये तसेच इतर समारंभामध्ये पाहिलेले आहे आणि या वाद्याला कधीही तुतारी म्हणून महाराष्ट्रातील जनमाणसाने संबोधलेले नाही. असे असताना निवडणूक आयोगाने गेली अनेक शतके ट्रंपेट म्हणून ओळखल्या जाणार्या या वाद्याला तुतारी म्हणून का मान्यता दिली, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तुतारीला महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये शिंग या दुसर्या नावाने ओळखले जाते. परंतू ब्रास बॅण्डमध्ये वापरल्या जाणार्या ट्रंपेटला निवडणूक आयोगाने व सातार्यातील निवडणूक निर्णय अधिकार्यांनी तुतारीचा दर्जा का दिला, असा प्रश्न सामान्य सातारकर करीत आहेत. तुतारी आणि ट्रंपेटच्या संभ्रमात अडकलेले सातार्यातील मतदार मात्र नक्की मत कोणत्या तुतारीला द्यायचे, या पेचात असतानाच निवडणूक आयोग मात्र यावर चुप्पी साधून असून लवकरात लवकर याबाबत निवडणूक आयोगाने याबाबत खुलासा करावा, अशी मागणी सातारा लोकसभा मतदारसंघातील मतदार करीत आहेत.
तुतारी आणि ट्रंपेटचा इतिहास…
महाराष्ट्रात लग्न समारंभ असो, किंवा कुस्त्यांचा आखाडा. सभेचे मैदान असो, वा यात्रा-जत्रा. यामध्ये तुतारीचा निनाद आसमंतात घुमतो. तुतारीशिवाय महाराष्ट्राच्या मातीला दरवळ येत नाही. परंतू तुतारी हे वाद्य शिवकाळापासून याच महाराष्ट्रात फुंकले जाते. पण या तुतारीचा म्हणजेच निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार ट्रंपेटचा इतिहास इसवी सनाच्या दुसर्या शतकातील प्राचीन इजिप्तमधील आहे. याच वाद्याला पूर्वी ट्रंपेट म्हटले जात असे. अठराव्या शतकामध्ये हेच वाद्य प्रथमत: पोर्तुगिजांची वसाहत असणार्या गोव्यात आले आणि गोव्यातील काही वादक हेच वाद्य हिंदी चित्रपटांमध्ये वाजवू लागले. 70 आणि 80 च्या दशकातील गीते या ट्रंपेटशिवाय पूर्ण होत नसत. तुतारी आणि ट्रंपेट या वायू वाद्यांमध्ये जमीन-आस्मानाचा फरक आहे, हे महाराष्ट्रातीलच काय पण सातार्यातील शेंबडं पोरगंही सांगू शकतं. परंतू निवडणूक आयोगाला हे कळतंय, पण वळत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे जिल्ह्यातील मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून निवडणूक आयोगाने याबाबत तत्काळ स्पष्टीकरण देवून हा संभ्रम दूर करावा, अशी मागणी होवू लागली आहे.
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला संगमनगर येथे गळती |
विद्यार्थ्यांसाठी ‘आरटीई’ प्रवेशाचे आदेश आले; मात्र अंमलबजावणी करण्यास शाळांचा अनुत्साह |
लग्नास तगादा लावल्याने युवकाने केली आत्महत्या |
पी एम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय क्षेत्र माहुलीच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम |
विहिरीचे बांधकाम सुरू असताना आरसीसी पडदी कोसळली |
गाडी अंगावर घालून सासूचा खून |
सातारा जिल्ह्यात ७ दिवसांपासून वळीव पाऊस सुरूच |
भजनी मंडळांसाठी भव्य 'जिल्हा भजन महोत्सव' आयोजित करणार : आ. शिवेंद्रसिंहराजे |
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूर आणि दरडप्रवण क्षेत्रात खबरदारीच्या सर्व उपाययोजना तयार ठेवा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी |
शेतकरी हित जोपासने हीच खरी स्व. भाऊसाहेब महाराजांना श्रद्धांजली |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
वेण्णा लेक परिसरातून सुमारे पाच लाखांच्या दागिन्यांची चोरी |
बसस्थानक परिसरातून युवती बेपत्ता |
जरांगे पाटलांचा जीवनपट चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न |
विहिरीचे बांधकाम सुरू असताना आरसीसी पडदी कोसळली |
गाडी अंगावर घालून सासूचा खून |
सातारा जिल्ह्यात ७ दिवसांपासून वळीव पाऊस सुरूच |
भजनी मंडळांसाठी भव्य 'जिल्हा भजन महोत्सव' आयोजित करणार : आ. शिवेंद्रसिंहराजे |
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूर आणि दरडप्रवण क्षेत्रात खबरदारीच्या सर्व उपाययोजना तयार ठेवा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी |
शेतकरी हित जोपासने हीच खरी स्व. भाऊसाहेब महाराजांना श्रद्धांजली |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
वेण्णा लेक परिसरातून सुमारे पाच लाखांच्या दागिन्यांची चोरी |
बसस्थानक परिसरातून युवती बेपत्ता |
जरांगे पाटलांचा जीवनपट चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न |
महिला सरपंचांना सीएसआर फंडाची होणार मदत |
उधारीचे पैसे मागितल्यावरुन एकास मारहाण |
चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |
डॉक्टर दाम्पत्यास मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |