सातारा : सध्या साथीच्या आजाराप्रमाणे समाजात कॅन्सरचे प्रमाण वाढताना दिसत आहे. या जीवघेण्या आजाराविषयी शास्त्रोक्त माहितीपेक्षा भीती व गैरसमज अधिक पसरलेले आहेत. हे गैरसमज दूर करून सर्वसामान्य नागरिकांना योग्य आणि शास्त्रीय माहिती मिळावी, या उद्देशाने धन्वंतरी पतसंस्था जीपीथॉन 2026 अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
या मॅरेथॉनच्या माध्यमातून कॅन्सरपासून बचावासाठी घ्यावयाची काळजी, वेळेत निदान होण्यासाठी आवश्यक तपासण्या तसेच उपचारपद्धती याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून शुक्रवार, दि. 24 जानेवारी रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत कमानी हौदाजवळील धन्वंतरी पतसंस्थेच्या धन्वंतरी हॉलमध्ये महिलांसाठी गर्भाशयाची पॅप स्मिअर (Pap Smear) चाचणी व स्तन तपासणी (Breast Screening) मोफत करण्यात येणार आहे. या तपासणीचा लाभ 30 ते 65 वयोगटातील महिला घेऊ शकतात. इच्छुक महिलांनी 8856039040 या व्हॉट्सॲप क्रमांकावर स्वतःच्या व्हॉट्सॲपवरून नाव नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
‘रन फॉर कॅन्सर अवेरनेस’ या संकल्पनेतून रविवार, दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी साताऱ्यात शाहू स्टेडियम ते यवतेश्वर घाट आणि पुन्हा शाहू स्टेडियम या मार्गावर 3 किमी व 10 किमी अंतराच्या ‘धन्वंतरी पतसंस्था जीपीथॉन 2026’ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा अत्यंत दर्जेदार पद्धतीने होणार असल्याची माहिती स्पर्धेचे अध्यक्ष डॉ. नितीन लेंभे आणि रेस डायरेक्टर डॉ. दयानंद घाडगे यांनी दिली.
या मॅरेथॉनसाठी सातारा, पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर, बेळगाव आणि बारामती आदी ठिकाणांहून धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी संतोष पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, सातारा नगराध्यक्ष अमोल मोहिते आणि सातारा हिल मॅरेथॉनचे संस्थापक डॉ. संदीप काटे यांच्यासह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
ही मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी जीपी असोसिएशन सातारा संस्थापक डॉ. रविंद्र भोसले, डॉ. कांत फडतरे, डॉ. अरविंद काळे, डॉ. शिरीष भोईटे, आयर्नमॅन डॉ. सुधीर पवार, डॉ. जयदीप चव्हाण, डॉ. जवाहर शहा, डॉ. अभय टोणपे, अध्यक्ष डॉ. राजेंद्र सकुंडे, सचिव डॉ. किशोर शिंदे यांच्यासह धन्वंतरी पतसंस्था जीपीथॉन 2026 आणि जीपी असोसिएशन साताराचे सर्व पदाधिकारी व संचालक परिश्रम घेत आहेत.
या स्पर्धेसाठी नावनोंदणी करण्याची अंतिम तारीख 25 जानेवारी 2026 आहे. तसेच दिनांक 24 जानेवारी रोजी सकाळी दहा ते दोन या दरम्यान धन्वंतरी पतसंस्था परिसरातील धन्वंतरी हॉल येथे कॅन्सर जनजागृती तपासणी शिबीर अंतर्गत महिलांच्या गर्भाशयाची चाचणी व स्तनांची तपासणी मोफत करण्यात येणार आहे .यासाठी 30 ते 65 वयोगटातील महिला या तपासणीचा लाभ घेऊ शकतात असे संयोजकांनी कळवले आहे.