सातारारोड : मुंबईतील मराठा आंदोलनादरम्यान मराठा समाज बांधव या नात्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी सहकार्य करून दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा आज ल्हासुर्णे येथील त्यांच्या निवासस्थानी मराठा क्रांती मोर्चा राजधानी सातारातर्फे गौरव करण्यात आला.
यावेळी संयोजकांनी सांगितले, की क्रांतियोद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर केलेल्या बेमुदत उपोषणादरम्यान राज्य सरकारने वेगवेगळ्या मार्गाने आंदोलकांची कोंडी केली होती. मराठा समाजाचे मुंबईत आंदोलन होऊ नये, याची पुरेपूर काळजी सरकारने घेतली होती. आंदोलन मोडीत काढण्यासाठी पावले टाकण्यास सुरुवात केली होती. आंदोलकांची रसद सरकारने तोडून टाकली होती. खाऊ गल्लीपासून ते पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल आंदोलकांना मिळू नये, यासाठी सरकार वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करत होते.
या पार्श्वभूमीवर मराठा समाजबांधव या नात्याने आमदार शशिकांत शिंदे यांनी नवी मुंबईतील बाजार समिती आवारात आणि सिडको परिसरात आंदोलकांची निवास व्यवस्था केली. आझाद मैदान ते नवी मुंबई यादरम्यान आंदोलक लोकलद्वारे ये-जा करू शकले. कुटुंबातील घटकाप्रमाणे आंदोलकांची काळजी घेतली गेली, अगदी आरोग्य सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या. अहोरात्र जागून आमदार शशिकांत शिंदे यांनी आंदोलकांना सहकार्य केले. मनोज जरांगे-पाटील यांची मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनस्थळी भेट घेऊन पाठिंबा दर्शविला आणि राज्य सरकारला याविषयी अद्यापपर्यंत जाग आली नाही, असे निदर्शनास आणून दिले होते.
त्यानंतर सरकारने आंदोलनाचा आणि आंदोलकांचा वाढता दबाव पाहून आरक्षण देण्याविषयी पावले टाकण्यास सुरुवात केली आणि त्यातून मार्ग निघाला. त्याबद्दल आज सकल मराठा समाजबांधवांच्या वतीने आमदार शशिकांत शिंदे यांचा गौरव करण्यात येत आहे. याप्रसंगी मान्यवरांनी समाजाच्या एकजुटीची व बलशक्तीची गरज अधोरेखित केली. मराठा क्रांती मोर्चा, राजधानी सातारातर्फे सकल मराठा समाजबांधवांनी केलेल्या सन्मानाचा मनापासून स्वीकार करत असल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी यावेळी सांगितले. सहकार्य, त्याग आणि त्यामागील समाजहिताची भावना हीच खरी ताकद असल्याचे आणि पुढील काळ हा कसोटीचा असल्याचे नमूद करत मराठा समाजाच्या हितासाठी लढण्याचा निर्धार आमदार शशिकांत शिंदे यांनी याप्रसंगी केला.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
