कराड : खोडजाईवाडी, ता कराड येथे दोन चोरट्यांनी घरात घुसून पती-पत्नीला मारहाण करीत त्यांच्या डोळ्यात मिरचीपुड टाकून दोन तोळ्याचे मंगळसूत्र लंपास केले. शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, खोडजाईवाडी येथील राजाराम किसन मांडवे यांचे घर गावापासून काही अंतरावर किवळ रस्त्यालगत आहे. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास राजाराम मांडवे हे टीव्ही पाहत घरात बसले होते. त्यांची पत्नी घरातील कामे करीत होती. त्यावेळी तोंडाला रुमाल बांधून अचानक दोन चोरट्यांनी घरात प्रवेश केला.
त्यापैकी एका चोरट्याने राजाराम मांडवे यांना मारहाण करून खुर्चीवरून खाली ढकलले. तसेच डोळ्यात मिरची पूड टाकून पत्नीच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसकावून क्षणात पोबारा केला. अचानकपणे झालेल्या घटनेने मांडवे दाम्पत्य भयभीत झाले.
काही दिवसांपूर्वी चोरट्यांनी अशाचप्रकारे मांडवे यांच्या घरात चोरीचा प्रयत्न केला होता. मात्र, तो अयशस्वी झाला. चोरट्यांनी केलेल्या धाडसी चोरीमुळे आता घरातही महिला सुरक्षित नसल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.