सातारा : सातारा–पंढरपूर मार्गावरील धुळदेव परिसरात कच्च्या रस्त्यावरून कार पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात आजोबा व नातीचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी असून चौघेजण किरकोळ जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कोडोली (ता. सातारा) येथील अशोक विष्णू निकम (वय ७७) आणि त्यांची नात लक्ष्मी सचिन निकम (वय १३) हे अल्टो कारमधून प्रवास करत असताना धुळदेव येथे कच्च्या रस्त्यावर वाहनाचा ताबा सुटल्याने कार पलटी झाली. अपघात इतका भीषण होता की दोघांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात कारमधील इतर प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत जखमींना बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
कच्च्या रस्त्यांवरील धोकादायक प्रवास पुन्हा चर्चेत
या घटनेमुळे कच्च्या व खराब रस्त्यांवरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागरिकांकडून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.