डॉ. संपदा मुंडे हिला न्याय दिला जाईल, प्रसंगी तपासासाठी एसआयटी नेमणार; रुपाली चाकणकर

by Team Satara Today | published on : 27 October 2025



फलटण : फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांबरोबर फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. संपदा मुंडे यांचे अनेक वेळा खटके उडायचे. मात्र, ते वाद आयसी कमिटीने मिटविले होते. लक्ष्मी पूजनादिवशी फोटो काढण्यावरून डॉ. संपदा मुंडे हिचा प्रशांत बनकरबरोबर वाद झाला, त्यावेळी डॉ. मुंडे एका मंदिरात जाऊन बसली होती तेव्हा तिला प्रशांत बनकरच्या वडिलांनी घरी आणले. मात्र, ती तिथून हॉटेलमध्ये गेली. तिने आत्महत्या केली असून या आत्महत्येचा तपास योग्य दिशेने सुरु आहे, त्या डॉक्टर युवतीला न्याय देण्यासाठी महिला आयोग या तपासावर लक्ष ठेवून आहे. त्यामध्ये काही गडबड वाटल्यास या घटनेचा तपासासाठी एसआयटी नेमली जाईल, असे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले.

येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर युवतीच्या मृत्यूने फलटणसह महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली असून उपजिल्हा रुग्णालयाला चाकणकर यांनी आज भेट दिली. आयसी कमिटीच्या सदस्यांची बैठक घेऊन या घटनेची चौकशी केली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, पोलीस उपअधीक्षक विशाल खांबे, डॉ. अंशुमन धुमाळ उपस्थित होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत चाकणकर म्हणाल्या, ‘‘ही घटना दुर्दैवी असून डॉक्टर महिलेला न्याय देण्यासाठी मी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांशी दररोज संपर्कात आहे. महिला डॉक्टरने ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांबरोबर आलेल्या वादाबाबत तक्रार केली होती. मात्र, आयसी कमिटीने पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये असलेला वाद मिटविला होता. तिने ज्यादिवशी आत्महत्या केली तेव्हा ती प्रशांत बनकरच्या संपर्कात होती, त्याला तिने अनेक वेळा कॉल केले आहेत. परंतु, त्याचा मोबाइल त्यादिवशी बंद होता. त्यावेळी तसेच त्यापूर्वीचे सर्व कॉल रेकॉर्ड, सीडीआर रिपोर्ट्स काढले आहेत.’’ फॉरेन्सिक रिपोर्ट आणि पीएम रिपोर्ट आज किंवा उद्या येतील, तेव्हा त्यातील सत्य असत्य बाहेर येईल, असेही चाकणकर यांनी स्पष्ट केले. शासकीय निमशासकीय ठिकाणी महाराष्ट्रात 31 टक्के महिला काम करीत असून त्यांना कोणताही त्रास अथवा लैंगिक शोषण होऊ नये यासाठी आयसी कमिटी सर्वच ठिकाणी स्थापन केल्या आहेत. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून या प्रकरणात कोणालाही अभय दिले जाणार नाही, असेही चाकणकर यांनी सांगितले,

या प्रकरणातील संशयित पीएसआय गोपाल बदने, प्रशांत बनकर व डॉक्टर महिला यांच्यातील काही दिवसांपासूनचे सीडीआर रिपोर्ट्स काढले आहेत, तसेच फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर या आत्महत्येचा उलगडा होईल, अशी माहिती चाकणकर यांनी दिली. फलटण तालुक्यातील अनेक विभागांत अनेक अधिकारी, कर्मचारी गेली अनेक वर्षे तिथेच काम करतात, त्याची बदली का होत नाही? त्याचबरोबर पोलिस कर्मचारी शहर की ग्रामीण, ग्रामीण की शहर किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात जातात हे कसं काय, या प्रश्नांना माहिती घेते, असे उत्तर चाकणकर यांनी दिले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोयना भूकंप पुनर्वसन निधीतून पाटणला 13 कोटींची विकासकामे होणार; पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे प्रयत्न
पुढील बातमी
संविधान संघर्ष समितीचे सातार्‍यात आंदोलन; जिल्ह्यात महिलांवरील वाढत्या अत्याचारांचा निषेध, जोरदार घोषणाबाजी

संबंधित बातम्या