वाठार येथे शुक्रवारी ‘वंदे मातरम्’ गौरव सामूहिक गायन; १५० व्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपाच्यावतीने आयोजन, मान्यवरांची उपस्थिती

by Team Satara Today | published on : 06 November 2025


सातारा  :  ‘वंदे मातरम्’ या ऐतिहासिक गीताच्या १५० व्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय जनता पार्टी, सातारा जिल्ह्याच्यावतीने शुक्रवारी (ता. ७) सकाळी ८.३० वाजता वाठार (ता. कराड) येथील कृष्णा फाउंडेशन कॅम्पस येथे भव्य ‘वंदे मातरम् गौरव सामूहिक गायन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला नागरिक, विद्यार्थी, तरुण आणि स्वयंसेवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक शक्तीदायी घोषवाक्य म्हणून ‘वंदे मातरम्’ ओळखले जाते. या गाण्याने क्रांतिकारक, सत्याग्रही आणि स्वातंत्र्यसेनानींच्या मनात अपार प्रेरणा आणि राष्ट्रभक्तीचे तेज चेतवले. ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधातील लढ्यात ‘वंदे मातरम्’चा जयघोष हे धैर्य, एकता आणि देशभक्तीचे प्रतीक बनले. या गीताला ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त भारतभर १५० ठिकाणी सामूहिक गायन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, महाराष्ट्रातील कराड, नागपूर, अकोला, ठाणे, रायगड, पुणे, अहिल्यानगर, धुळे, छत्रपती संभाजीनगर या निवडक शहरांमध्ये उत्सवपूर्ण वातावरणात कार्यक्रम होणार आहेत. 

वाठार येथील कृष्णा फाउंडेशन कॅम्पस येथे सातारा लोकसभेचे खासदार उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुलबाबा भोसले, आ. मनोज घोरपडे, संघटनमंत्री मकरंद देशपांडे, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन, वंदे मातरम्‌चे सामूहिक गायन आणि स्वदेशीची शपथ घेतली जाणार आहे. 

या कार्यक्रमाला देशप्रेमी नागरिक, विद्यार्थी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपाच्यावतीने करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
स्टायलिश व तोकडे कपडे घालून जाणाऱ्या महिलांना सज्जनगडावर बंदी; श्री रामदास स्वामी संस्थानचा पोशाखासंदर्भात नवीन नियम लागू करण्याचा निर्णय
पुढील बातमी
जिल्ह्यात 10 नगरपालिका निवडणुकीसाठी तीन लाख 86 हजार 455 मतदार; एकूण 437 मतदान केंद्रे; 532 कंट्रोल युनिटची उपलब्धता

संबंधित बातम्या