गोवा : गोव्यातील अरपोरा येथील नाइटक्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी आहेत. या दुर्घटनेनंतर परिसरात शोक आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी संबंधित नाइट क्लबला सील, तर क्लबच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. तसेच, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मजिस्ट्रेट चौकशीचे आदेश दिले आहेत.
प्रमोद सावंत यांनी एक्सवर प्रतिक्रिया देत म्हटले की, अरपोरा येथील आग प्रकरणाची मी बारकाईने पाहणी करत आहे. 25 जणांचा मृत्यू आणि 6 जण जखमी हे अत्यंत दुर्दैवी आहे. सर्व जखमींना उत्तम उपचार दिले जात आहेत. संपूर्ण प्रकरणाची मजिस्ट्रेटस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, जेणेकरून या दुर्घटनेची कारणे समोर येतील आणि दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल. गोवा काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनीही या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. त्यांनी म्हटले, अरपोरा येथील ‘बिर्च बाय रोमियो लेन’ नाइटक्लबमध्ये लागलेल्या आगीत निरपराध लोकांचा जीव गेला, ही अत्यंत मन हेलावून टाकणारी घटना आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले, त्या सर्व कुटुंबांना आमच्या संवेदना.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री सावंत यांच्याशी संपर्क साधून घटनेची संपूर्ण माहिती घेतली आणि जखमींबाबत विचारपूस केली. पीएमओने जाहीर केलेल्या अनुदानानुसार, मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपये दिले जातील.
गोवा पोलिसांच्या माहितीनुसार मृतांमध्ये 4 पर्यटक आणि 14 क्लब कर्मचारी आहेत, तर 7 जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. सिलिंडर स्फोटामुळे आगी लागल्याचे बोलले जात आहे. पोलिस आणि अग्निशमन विभागाकडून तपास सुरू असून प्राथमिक अहवाल तयार केला जात आहे. दरम्यान, या दुर्घटनेनंतर गोव्यातील नाइटलाइफ, पर्यटन स्थळांची सुरक्षा आणि फायर सेफ्टी सिस्टीम यावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.