सज्जनगड नजिक कोसळली दरड

अर्ध्या तासात वाहतूक पूर्ववत

by Team Satara Today | published on : 22 June 2025


सातारा : सातारा-सज्जनगड रस्त्यावर रविवारी दुपारी दरड कोसळली. दगड-मातीबरोबरच झाडाच्या फांद्या रस्त्यावर आल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. सुदैवाने या मार्गावर वाहतूक सुरू नसल्याने जिवित वा वित्त हानी झाली नाही.

या घटनेची माहिती मिळताच, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तातडीने दरड हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. पावसाळा सुरू झाल्यापासून महाबळेश्वर, जावळी व सातारा तालुक्यात दरड कोसळण्याचे सत्र सुरू झाले आहे. काही दिवसांपूर्वी सज्जनगड जवळील बोरणे घाटात दरड कोसळली होती. अतीवृष्टीमुळे अशा घटना वाढू लागल्याने वाहनधारकांनी रात्रीच्या वेळी घाटरस्त्यातील प्रवास टाळावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने रविवारी दुपारनंतर तत्काळ यंत्रणा घटनास्थळी रवाना केली. अर्ध्या तासामध्ये दरड हटविण्यात आली आणि वाहतुकीचा मार्ग मोकळा करण्यात आला. हा डोंगर परिसर लाल मातीचा असल्याने मुसळधार पावसाने डोंगरावरची माती निसटून रस्त्यावर येत आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूत्रांनी दिली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नवी कोरी थार आणि वेदांतसाठी उदयनराजे यांचे लॉट्स ऑफ लव्ह

संबंधित बातम्या