सातारा : सातारा जिल्हा परिषद पाटखळ गटातून रयत क्रांती संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांच्या पत्नी संजना प्रकाश साबळे यांनी रयत क्रांती पक्षाच्यावतीने निवडणूक नामनिर्देशन पत्र आज मोठे शक्तिप्रदर्शन करत दाखल करण्यात आला.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जाहीर झाल्यापासून फॉर्म भरण्याची लगबग सगळीकडेच पाहायला मिळत आहे. पाटखळ जिल्हा परिषद गटामध्ये सर्वसाधारण महिला आरक्षण पडले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून कायम वाचा फोडत शेतकरी हिताचे कार्य करत असलेले एक युवा नेतृत्व प्रकाश उर्फ सोनू साबळे यांना तालुक्यासह पाटखळ गटातील ओळख आहे. त्यांनी भागातील शेतकऱ्यांसाठी आवाज उठवलेला आहे. रयत क्रांती पक्षाच्या माध्यमातून उसबिले आंदोलन, कारखान्यांचे वजन काटे तपासणी, शेतकऱ्यांच्या थकीत दूध बिलांसाठी आंदोलन उभारुन प्रश्न मार्गी लावले आहेत. याची दखल घेत महायुतीचा घटक पक्ष असलेला रयत क्रांती पक्षाच्यावतीने माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी पाटखळ गटाची उमेदवारी संजना साबळे यांना जाहीर केली. त्यानंतर आज मोठे शक्तिप्रदर्शन करीत यांनी गटातील शेतकरी, सहकारी यांच्यासमवेत उमेदवारी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केला. त्यांच्या उमेदवारीने पाटखळ गटात काँटे कि टक्कर होण्याची शक्यता आहे.