महिला अडचणीत असताना गृह खात्याच्या झोपा

आमदार प्रणिती शिंदे यांची सातार्‍यात टीका

by Team Satara Today | published on : 04 October 2024


सातारा : राज्यात महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढ चालल्या आहेत. विकृत लोक हे चिमूरड्या मुलींनाही सोडत नाहीत. राज्यात महिला मानसिक सक्षम राहिल्या नाहीत. त्यांचे जगणे मुश्कील झाले असताना गृहखाते झोपा काढत आहे. या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असा टोला खा. प्रणिती शिंदे यांनी महायुती सरकारला लगावला.

सातारा जिल्हा कॉंग्रेस कमिटीमध्ये इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण, जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, महिला जिल्हाध्यक्ष अल्पना यादव, नरेश देसाई, रणजित देशमुख उपस्थित होते.

खा. शिंदे म्हणाल्या, सातार्‍यात कॉंग्रेस विचाराचा एकच आमदार असून आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सातार्‍यात आमदार संख्या वाढावी. पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकजुटीने काम करणे गरजेचे आहे. लोकसभेत जे चित्र दिसून आले, त्यापेक्षा आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात चांगले वातावरण आहे. कार्यकर्त्यांमध्ये लोकसभा निवडणुकीची ऊर्जा आहे. राज्यात शेतकरी, महिला या महायुती सरकारला वैतागला आहे. बदलापूर, पुणे यांसह अन्य ठिकाणी लहान मुलींवर, महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढतच आहेत. विकृत लोक चिमुरड्यांनाही सोडत नाहीत. अशा विकृत मानसिकतेचा वध केला पाहिजे. सरकार हे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणून मते विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यात सुमारे 64 हजार मुली बेपत्ता आहेत. त्यावर गृहविभाग काहीच करताना दिसत नाही. निवडणूक लागली कि महायुती सरकारला लाडकी बहिण आठवली असल्याचा आरोप त्यांनी केला.

आ. चव्हाण म्हणाले, राज्यातील जागा वाटप निर्णय अद्याप झाला नसून तो वरिष्ठ पातळीवर आहे. अशोक चव्हाण गेले आहेत त्याठिकाणी सुखी रहावे. विरोधकांवर टीका करू नये. मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला असून याबाबत मी मुख्यमंत्री असताना प्रस्ताव तयार केला होता. गेली दहा वर्षे सरकार हा निर्णय घेतला नसून आगामी निवडणूक तोंडावर अभिजात दर्जा दिला आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
हिंदू बहुजन सन्मान यात्रेचे सातारा शहरात उस्फुर्त स्वागत
पुढील बातमी
मसाप शाहुपुरी शाखेच्यावतीने पोवई नाक्यावर साखर वाटप

संबंधित बातम्या