चीन मीडियाने भारतावर अमेरिकेने लावलेल्या टॅरिफवर दिली प्रतिक्रिया

by Team Satara Today | published on : 07 August 2025


नवी दिल्ली : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर २५ टक्के अतिरिक्त समतुल्य आयात शुल्क (टॅरिफ) लावले. त्याबरोबर अमेरिकेत भारतीय वस्तूंवर लागणारे टॅरिफ आता ५० टक्क्यांवर पोहोचले आहे. भारताने रशियाकडून खनिज तेल खरेदी सुरूच ठेवल्यामुळे दंड म्हणून अतिरिक्त शुल्क लावण्यात येत असल्याचे ट्रम्प यांनी जारी केलेल्या कार्यकारी आदेशात म्हटले आहे. यावर जगभरातील देशांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. चीन मीडियानेही भारतावर अमेरिकेने लावलेल्या टॅरिफवर प्रतिक्रिया देताना दोन्ही देशांना चिमटेही काढले आहेत.

चीन मीडियाने म्हटले आहे की, अमेरिका-भारत व्यापार संबंधांमधील नाट्यमय घसरण ही केवळ रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्याचा विषय नाही. तर, एका आज्ञाधारक मित्राचा बंडखोर होण्याचा मुद्दा आहे. अमेरिकच्या तत्त्वांनुसार, भारत त्यांचा एक 'महान मित्र' असू शकतो, परंतु जर तो आज्ञाधारक राहिला तरच. अमेरिकन धोरणांची चिरफाड झाली आहे. अमेरिका हा भारताच्या धोरणांमधील तटस्थतेला विश्वासघात आणि राजनैतिक स्वातंत्र्याचा विश्वासघात मानतो, असा दावा चीन मीडियाने केला आहे.

अमेरिका आणि युरोप हे भारतावर रशियाशी व्यापार करत असल्याचा आरोप करतात, पण ते स्वतः रशियाकडून मोठ्या प्रमाणात अनेक गोष्टी आयात करतात. अमेरिका-भारत संबंधांमधील हा बदल अचानक घडल्याचे दिसून येत आहे. अलीकडेच अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठ्या प्रमाणात स्वागत केले होते. त्यांना "एक अद्भुत मित्र" म्हटले होते. परंतु काही महिन्यांनंतरच लगेचच व्यापारी करारावरून संबंध बिघडले, असेही चीन मीडियाने म्हटले आहे.

भारताच्या अनिच्छेमुळे अमेरिका-भारत व्यापार करार रखडला आहे. यालाच प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन सरकारने भारताला तडजोड करण्यास भाग पाडण्यासाठी रशियाशी असलेल्या भारताच्या ऊर्जा संबंधांचा दबाव आणण्यासाठी वापर करण्याची रणनीती स्वीकारली आहे. रशियावर अमेरिकेचा थेट आर्थिक दबाव त्यांच्या छोट्या व्यापारामुळे मर्यादित असल्याने अमेरिकेने आता दोन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भारताच्या रशियाशी असलेल्या जवळच्या संबंधांना लक्ष्य करत आहे. रशियाला रोखणे आणि भारतावर दंडात्मक कारवाई करणे, हेच अमेरिका करत आहेत, असेही चीन मीडियाने सांगितले.

दरम्यान, अमेरिकेने लावलेले ५० टक्के टॅरिफ 'अन्यायकारक, अनुचित व अवाजवी' असल्याचे भारताने म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, देशाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जातील. तेल आयात ही बाजारातील स्थिती व १४० कोटी भारतीयांच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी केली जाते आणि असे पाऊल इतरही अनेक देश उचलत आहेत. अमेरिकेने लादलेल्या टॅरिफचा भारतावर मोठा आर्थिक परिणाम होऊ शकतो. अमेरिकेच्या टॅरिफचा कापड व रेडिमेड कपडे, रत्ने व आभूषणे, इंजिनिअरिंग सामान व ऑटो पार्ट्स, मसाले व कृषी उत्पादनांच्या मागणीवर विपरित परिणाम होऊ शकतो. मागणीवर परिणाम झाल्याने निर्यात घटू शकते. कंपन्यांतील लाखो नोकऱ्यांवर संकट येऊ शकते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मुख्यमंत्री सहायता कक्षातून 24 तासात होते मदत उपलब्ध
पुढील बातमी
गरम तेलाने डोक्याला मसाज केल्याने तुमचे केस होतात सुंदर आणि निरोगी

संबंधित बातम्या