अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात घालमोडे दादांची परंपरा पुढे सुरू ठेवली

विश्वास पाटलांच्या निवडीवर विद्रोहीच्या प्रवक्त्यांकडून टीका ; संमेलनावर मनुवादी विचारसरणीचा प्रभाव

by Team Satara Today | published on : 17 September 2025


सातारा, दि. १७  : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अर्थात संघ परिवाराशी संबंधित असलेल्या समरसता साहित्य संमेलनाचे यापुर्वी अध्यक्षपद भूषविलेल्या विश्वास पाटील यांची सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नेमणूक करून महात्मा फुले यांच्या भाषेतच सांगायचे असेल तर घालमोडे दादांची ही परंपरा त्यांनी पुढे चालू ठेवली आहे असेच दिसून येते. त्यामुळे या संमेलनावर संघाच्या वर्चस्वाचाच म्हणजेच मनुवादी विचारसरणीचा प्रभाव असणार हे उघड आहे, अशी प्रतिक्रिया विद्रोही सांस्कृतीक चळवळ महाराष्ट्राचे अध्यक्ष कॉ धनाजी गुरव व सरचिटणीस कॉ. डॉ. जालिंदर घिगे यांनी व्यक्त केली आहे.

सातारा येथे होणाऱ्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची नेमणूक केल्यानंतर त्यावर सातारा येथेच होणाऱ्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाचे निमित्ताने विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्रचे अध्यक्ष कॉ धनाजी गुरव व कॉ डॉ जालिंदर घिगे यांनी उपरोक्त प्रतिक्रिया देऊन खरमरीत टीका केली आहे.

शिव-फुले-शाहू- डॉ बाबासाहेब आंबेडकर- अण्णाभाऊ साठे क्रांतिसिंह नाना पाटील- कर्मवीर भाऊराव पाटील तसेच संत परंपरेतील संत कबीर, जगद्गुरु तुकोबाराय, संत सोयराबाई, संत जनाबाई आदींच्या समतावादी, मानवतावादी भूमिकेच्या विरोधात बोलणाऱ्याची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आलेली आहे. महात्मा फुले यांनी उल्लेखलेल्या बोलक्या सुधारकांच्या उदाहरणातील हे अध्यक्ष आहेत असेच म्हणावे लागेल, जात वर्चस्वातून अपमानजनक असे वक्तव्य करणाऱ्या आणि नंतर माफी मागणाऱ्या माफीवीर विश्वास पाटील यांची नेमणूक करून अखिल भारतीय वाल्यांनी आपली भूमिकाच स्पष्ट केलेली आहे. मागासवर्गीयांबद्दल जात वर्चस्वातून त्यांनी जे अकलेचे तारे तोडले त्याचे बक्षीशीच मनुवाद्यांनी त्यांना अध्यक्षपद देऊन दिली असल्याचे स्पष्ट होत आहे, असे विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्रचे प्रवक्ते कॉ अविनाश कदम व कॉ विजय मांडके यांनी म्हटले आहे.

मराठी साहित्य संमेलनवाल्यांनी चिपळूण येथे परशुराम तर ठाणे येथे नथुराम याच्याशी बांधिलकी दाखवली होती. आता छ. संभाजी महाराज यांची बदनामी करण्यात पुढे असलेल्या विश्वास पाटील यांची अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आलेली असल्याने त्यांचा हेतू स्पष्ट असल्याचे दिसत आहे, असाही आरोप कॉ. अविनाश कदम व कॉ. विजय मांडके यांनी केला आहे.

विद्रोही साहित्य संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन

महात्मा फुलेंनी तत्कालीन ग्रंथकार सभेस पत्र लिहून अशा घालमोडे दादांच्या संमेलनास न जाण्याची भूमिका घेतली होती. कष्टकरी, बहुजन वर्गाच्या दुःखाची चर्चा न करणाऱ्या व त्यावर उपाय न सांगणाऱ्या अशा अखिल भारतीय संमेलनास न जाता बहुजन समाजाने आपले दुःख , वेदना, प्रश्न उपाय मांडणाऱ्या विद्रोही साहित्य संमेलनामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन देखील अध्यक्ष कॉ धनाजी गुरव, सरचिटणीस डॉ जालिंदर घिगे, प्रवक्ते कॉ. अविनाश कदम व कॉ विजय मांडके विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे संस्थापक व माजी संमेलनाध्यक्ष वाहरूभाऊ सोनवणे, डॉ बाबुराव गुरव , ॲड. भाई सुभाष पाटील आदींनी केले आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शिरवळमधील गोळीबार 2016 साली झालेल्या हत्येतून
पुढील बातमी
ठेवीदारांच्या अब्जावधी रुपयांवर डल्ला मारणार्‍या फरार अर्चना कुटे जेरबंद

संबंधित बातम्या