सातारा : महायुतीकडून दूजाभाव वागणूक मिळाल्याने आ.सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटनेच्या सातारा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची विधानसभा निवडणुकी संदर्भात महत्वाची निर्णायक बैठक उद्या १८ नोव्हेंबर रोजी निमंत्रित करण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
जिल्ह्यात महायुतीमध्ये रयत क्रांती संघटनेला कोणतेही स्थान नाही. रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांचा फोटो देखील कोणत्याही बॅनरवर नाही. भारत आणि सातारा जिल्हा कृषी प्रधान आहे. राज्यातील बळीराजाचे नेतृत्व रयत क्रांती संघटनेचे नेतृत्व आ.सदाभाऊ खोत करीत आहेत. मात्र सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात महायुतीने आ.सदाभाऊ खोत यांच्या सातारा जिल्ह्यात शेतकऱ्यांची रयत क्रांती संघटनेला विचारात घेतले नाही. म्हणूनच की काय रयत क्रांती संघटनेच्या सातारा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची सोमवार दि.१८ रोजी सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी हॉटेल लेक व्ह्यू याठिकाणी निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाची बैठक आयोजित केलेली आहे. त्यानंतर १२ वाजता पत्रकार परिषद होऊन निवडणुकीसंदर्भातील निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.
आ.सदाभाऊ यांची रयत क्रांती संघटना सातारा जिल्ह्यात उद्याच्या बैठकीत नेमकी काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.