भाऊसाहेब महाराजांनी सर्वसामान्यांच्या जीवनाचा मळा फुलवला

डॉ. चारुदत्त आफळे; सुश्राव्य कीर्तनाने सातारकर रसिक श्रोते मंत्रमुग्ध

by Team Satara Today | published on : 06 February 2025


सातारा : जीवन हे नश्वर आहे. या जगात कोणीही अमर नाही. असे असले तरी, काही लोक त्यांच्या अजोड कार्य कर्तृत्वाने, त्यांनी केलेल्या कार्याने अजरामर होतात, कायम लक्षात राहतात. अशा लोकांमध्ये स्व. भाऊसाहेब महाराज यांचा उल्लेख अग्रक्रमाने करावा लागेल. ज्या पद्धतीने संत सावता माळी यांनी आपला मळा फुलवला त्याच पद्धतीने स्व. भाऊसाहेब महाराजांनी आपल्या कार्याने सर्वसामान्य जनतेचा जीवनमळा फुलवला, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार डॉ. चारुदत्त आफळे बुवा, पुणे यांनी केले. 

स्व. अभयसिंहराजे भोसले उर्फ भाऊसाहेब महाराज यांच्या २१ व्या पुण्यस्मरणदिनानिमित्त कर्तव्य सोशल ग्रुपच्या वतीने गांधी मैदान, राजवाडा येथे डॉ. चारुदत्त आफळे यांचे सुश्राव्य कीर्तन आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. डॉ. आफळे यांच्या सुश्राव्य कीर्तन आणि अभंग- भजन गायनाने रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्यासह विविध मान्यवर आणि हजारो श्रोते उपस्थित होते. 

डॉ. आफळे यांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या 'देवाचिये द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्ती चारी साधियेल्या' या अभंगाने कीर्तनाचा आरंभ केला. विविध दाखले देत त्यांनी समाजातील सर्व प्रकारच्या समस्यांचा उहापोह केला. त्यांनतर त्यांनी संत सावता माळी यांच्या चरित्राचा दाखला देत समाजातील चांगल्या- वाईट गोष्टींवर प्रकाश टाकला. जे लोक समाजकार्यात आपली छाप सोडतात त्यांची कीर्ती कायम राहते. संत सावंत माळी यांनी आपल्या मळ्यात कष्ट करून, घाम गाळून शेती फुलवली. स्व. भाऊसाहेब महाराजांनी अजिंक्यतारा कारखाना, सूत गिरणी, विकाससेवा सोसायट्या यांच्या माध्यमातून सहकारक्रांती केली. सातारा तालुक्यात जलक्रांती घडवून सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी यांचे जीवन फुलवले असे ते म्हणाले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कर्तव्य सोशल ग्रुपच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वार्षिक उदयोग पाहणी सर्वेक्षण 31 जुलैपर्यंत होणार
पुढील बातमी
अनिल निंबाळकर यांची 33 व्या राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत महाराष्ट्र संघाच्या वरिष्ठ गटात निवड

संबंधित बातम्या