वाढे फाट्यावर पेढा विक्रीला जोर; वाहनचालकांसह प्रवाशांच्या मात्र जिवाला घोर

धोकादायक पद्धतीने उभारलेल्या फ्लेक्स सह आस्थापना मालकावर कारवाईची मागणी

by Team Satara Today | published on : 02 March 2025


- विनित जवळकर

सातारा : सातारा शहरानजिक असलेल्या वाढे फाट्यावर अनेक पेढे विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. मात्र, जाहिरातबाजीतून पैसे कमविण्याच्या नादात एकजण तर वाहनधारकांसह प्रवाशांच्या जिवाशी खेळत असल्याचे दिसून येत आहे. या महाशयांनी आपल्या दुकानाच्या जाहिरातीचा फ्लेक्स अक्षरश: निम्म्या सर्व्हिस रोडवर व कमी उंचीवर लावला असल्याने धोकादायक पद्धतीने उभारलेल्या या फ्लेक्स सह आस्थापना मालकावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

सातारी कंदी पेढा हा जगात सर्वश्रेष्ठ समजला जातो. साहजिकच सातार्‍याहून जाताना परजिल्ह्यातील, परराज्यातील प्रवासी, वाहनधारक येथील पेढे घरी घेवून जात असतात. तीन दशकांपूर्वी हा पेढा बहुतकरुन सातारा शहरातच मिळत असे. तेव्हा आडवी वाट करुन प्रवासी सातार्‍याला भेट देवून येथील कंदी पेढे घेवून जात असत. मात्र, मागणीचा विचार करुन काहीजणांनी आपली कंदी पेढ्याची दुकाने महामार्गावरच थाटली. त्यामुळे महामार्गावरुनच हे प्रवासी पेढ्याची खरेदी करु लागले. शेवटी, कोणी कोठे दुकान थाटावे, हा ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे. मात्र, महामार्गावरच पेढ्याची बक्कळ विक्री होत असल्याचे पाहून इतरांनीही आपले बस्तान महामार्गाकडे हलविले आणि पेढे विक्री सुरु केली.

सातारच्या महामार्गावर वारेमाप प्रमाणात ही सातारा कंदी पेढा विक्रीची दुकाने सुरु झाली. यानंतर सुरु झाला विक्रीसाठी जाहिरातीचा फंडा. सातारा शहरात जर पेढा घ्यायला गेलात तर एक किलो घ्या, नाहीतर दहा किलो घ्या. हातावर फक्त मासलेदाखल जो पेढा मिळेल, तेवढाच एक्स्ट्रा. मात्र, महामार्गावर आपल्याकडे ग्राहक खेचण्यासाठी या दुकानदारांनी 1 किलो पेढ्यावर चक्क पावशेर पेढे मोफत देण्याचा मार्ग अवलंबला. आता ते त्यांना कसे परवडते, हे त्यांचे त्यांनाच ठावूक. यानंतर महामार्गाच्या विरुद्ध बाजूस दिलेल्या नंबरवर केवळ फोन केल्यास पेढेवाले हा महामार्ग ओलांडून फोन करणार्‍या ग्राहकास मागणीप्रमाणे पेढे पोहोच करतात. मात्र, या जाहिरातबाजीने पेढेवाल्यांची आमदनी वाढली, त्यात काही शंकाच नाही.

असो, तर जाहिरात करणे, वा ग्राहकांना सुविधा पुरविणे यात गैर काहीच नाही. मात्र, आपण करीत असलेली जाहिरात कोणाचा जीव घेवू शकते, मोठा अपघात घडवू शकते, हे या महाशयांना कळलेले दिसत नाही. अथवा त्यांनी पैसे मिळविण्याच्या नादात त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलेले आहे.

सातारा-पुणे महामार्गानजिक असलेल्या सर्व्हिस रोडवर वाढे फाटा चौकापासून एका किलोमीटरच्या आतच एका महाशयांनी आपल्या दुकानाची जाहिरात फ्लेक्सद्वारे केली आहे. मात्र हा फ्लेक्स सर्व्हिस रोडवर जवळपास निम्म्या रस्त्यावर पसरला आहे. त्यातच हा फ्लेक्स कमी उंचीवर असल्याने हा फ्लेक्स वार्‍याने अथवा कोणत्याही मोठ्या वाहनाच्या धक्क्याने पडल्यास जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच पलिकडे काही वसाहती वसल्या आहेत. शिवाय शैक्षणिक संस्थाही आहे. यामध्ये शिक्षणासाठी येणारी-जाणारी मुले-मुली पायीच या फ्लेक्स खालून जात असतात. शिवाय वसाहतीमधील महिला, वृद्ध, महामार्गावरील वाहनधारक, प्रवासी, दुचाकीस्वार याच मार्गावरुन जातात. हा फ्लेक्स जोरदार वार्‍याच्या तडाख्याने पडल्यास येथे मोठी हानी होण्याची दाट शक्यता आहे.

त्यामुळे आपल्याच दुकानातील पेढ्यांची जास्त प्रमाणात विक्री व्हावी, आणि आर्थिक फायदा आणखी वाढावा, यासाठी संबंधित आस्थापनेच्या मालकांनी धोकादायक पद्धतीने दुकानाच्या जाहितीचा फ्लेक्स लावून जो येथील प्रवाशांच्या जिवाला घोर लावला आहे, त्यानुषंगाने फ्लेक्ससह आस्थापना मालकावरही कठोरात कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी होत आहे.

 वाढे ग्रामपंचायत नक्की काय करते?
संबंधित फ्लेक्स हा वाढे ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतो. हा धोकादायक पद्धतीने लावलेला फ्लेक्स वाढे ग्रामपंचायतीच्या एकाही पदाधिकार्‍याला दिसला नसेल, याचे आश्‍चर्य वाटते. का वाढे ग्रामपंचायतीनेच याबाबीकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे? असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे. या फ्लेक्समुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी वाढे ग्रामपंचायत घेणार का? वाहनधारकांसह प्रवाशांच्या जिवाशी खेळणार्‍या या फ्लेक्सबाबत आतातरी ग्रामपंचायतीने डोळसपणे पहावे, नाहीतर बैल गेला आणि झोपा केला, असेच होईल.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्यासाठी विवेकवाद जीवनाचा मूलाधार बनला पाहिजे
पुढील बातमी
भाजपा मध्ये सक्रिय सदस्य झाल्याशिवाय कोणतेही पद नाही

संबंधित बातम्या