फलटण : फलटण शहराचे मुख्य प्रवेशद्वार आणि व्यापाराचे केंद्र असलेली सोमवार पेठ सध्या नरकयातना भोगत आहे. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या फलटण-बारामती रस्ते रुंदीकरणाच्या संथ कामामुळे संपूर्ण पेठ अक्षरशः धुळीत हरवली असून, प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न आता गंभीर वळणावर येऊन ठेपला आहे.
नीरा उजवा कालवा ते कदम पेट्रोल पंप या दरम्यानच्या रस्त्याचे काम 'राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा'कडे वर्ग झाल्यापासून या भागातील नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. ब्रिटिशकालीन जुन्या पुलाला पर्याय म्हणून नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे, मात्र हे काम कासवगतीने सुरू असल्याने या परिसरात धुळीचे लोटच्या लोट हवेत तरंगताना दिसत आहेत. बारामती आणि मराठवाड्याकडे जाणारी अवजड वाहतूक याच मार्गावरून होत असल्याने, वाहनांच्या वर्दळीमुळे उडणारी धूळ घराघरांत आणि दुकानांत शिरत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, नियमानुसार बांधकामाच्या ठिकाणी उडणारी धूळ रोखण्यासाठी कंत्राटदाराने नियमितपणे पाणी मारणे बंधनकारक आहे. मात्र, संबंधित कंत्राटदाराकडून या साध्या नियमाचीही पायमल्ली केली जात आहे. धुळीच्या या साम्राज्यामुळे सोमवार पेठेतील अबालवृद्धांना श्वसनाचे विकार, डोळ्यांची जळजळ आणि त्वचेचे आजार जडले आहेत. अनेक नागरिक गंभीर आजारी पडले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. तरीही प्रशासकीय यंत्रणेला याचे सोयरसुतक नसल्याचे दिसत आहे.
नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत सोमवार पेठेतील हजारो मतदारांनी याच धुळीच्या प्रश्नावर उमेदवारांना जाब विचारला होता. त्यावेळी 'निवडून आल्यावर तातडीने उपाययोजना करू' असे आश्वासन देणारे लोकप्रतिनिधी आता कुठे गायब झाले आहेत? असा संतप्त सवाल रहिवासी विचारत आहेत. निवडणूक होऊन महिने उलटले, तरीही ना प्रशासनाने दखल घेतली ना नवनिर्वाचित नगरसेवकांनी.
सोमवार पेठेतील लोकांच्या सहनशक्तीचा अंत झाला असून, जर येत्या काही दिवसांत कंत्राटदाराने या ठिकाणी धूळ प्रतिबंधक उपाययोजना केल्या नाहीत आणि रस्त्यावर पाणी मारले नाही, तर आम्ही थेट रस्त्यावर उतरून महामार्गाचे कामच बंद पाडू, असा आक्रमक पवित्रा सोमवार पेठेतील नागरिकांनी घेतला आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास होणाऱ्या परिणामांना सर्वस्वी यंत्रणा जबाबदार असेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.