बारामती : बारामतीमधील लढत कुटुंबातील आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना बारामती मतदारसंघात प्रचारसभा घेण्याची विनंती केली नाही, असे उपमुख्यमंत्री आणि बारामती मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमदेवार अजित पवार यांनी गुरुवारी (दि. ७) माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
बारामतीमध्ये अजित पवार यांच्याविरोधात त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार निवडणूक लढवत आहेत. मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेणार का, यावर अजित पवार म्हणाले की, बारामतीची लढत कुटुंबातील आहे. कारण तेथील भांडण कुटुंबातील असल्याने मी पंतप्रधानांच्या सभेचा विचार केला नाही, असे अजित पवारांनी सांगितले.
अमित शहांसारख्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या सभा राष्ट्रवादीचे उमेदवार त्यांच्या मतदारसंघात घेऊ इच्छित नाहीत का, या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, प्रचारासाठी फारसा वेळच राहिलेला नाही. त्याचबरोबर निवडणूक खर्चाच्या मर्यादेमुळे मोठ्या सभा घेण्यावर मर्यादा येतात.
बारामती मतदारसंघात किती मतांनी विजयी होणार या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले की, मतदारसंघात फिरून आणि लोकांशी संवाद साधल्यानंतरच किती मतांनी विजय होईन हे मी सांगू शकेन; पण शंभर टक्के खात्रीने राज्यात महायुतील चांगले यश मिळेल, असा विश्वासही अजित पवारांनी व्यक्त केला.