धैर्या बहुआयामी प्रतिभावंत व्यक्तिमत्त्व : प्रा. मिलिंद जोशी

माऊंट एलबुस सर करणाऱ्या धैर्याचा जिद्द पुरस्काराने गौरव

by Team Satara Today | published on : 14 September 2025


पुणे, दि. १४ : मुलांमधील कलागुणांना प्रोत्साहन देणे हे खरे तर पालकांचे कर्तव्य आहे. परंतु आजचे बहुतांश पालक 'मार्क्सवादी' असल्याचे प्रकर्षाने जाणवते. पालकांनी मुलांवर अपेक्षांचे ओझे न लादता मुलांमधील क्षमता, गुण ओळखणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले. शिखरावर पोहोचण्याची ओढ असल्याशिवाय ते सर करता येत नाही. प्रतिकुलतेतून अनुकूलता निर्माण करत धैर्या हिने आपले नाव सार्थ ठरवले आहे. बहुआयामी प्रतिभावंत असे तिचे व्यक्तिमत्त्व आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

युरोप खंडातील माऊंट एलबुस हे १८ हजार ५१० फूट उंचीचे सर्वोच्च शिखर सर करणाऱ्या सातारच्या १३ वर्षीय धैर्या ज्योती विनोद कुलकर्णी हिचा रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे शनिवारी (दि. १३) जिद्द पुरस्काराने गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण शिखर बँकेचे अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी प्रा. मिलिंद जोशी अध्यक्षपदावरून बोलत होते.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती होती. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर मंचावर होते. सन्मानपत्र व भेटवस्तू असे पुरस्काराचे स्वरूप होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्योती कुलकर्णी यांचाही या वेळी विशेष सन्मान करण्यात आला.

प्रा. मिलिंद जोशी पुढे म्हणाले, धैर्या हिच्यामध्ये लहान वयातच प्रगल्भता निर्माण झाली आहे. नैराश्यावर मात करण्याची शक्ती मिळवत कसोटीच्या प्रसंगी सकारात्मकतेचा दीप प्रज्वलित करून तिने माऊंट एलबुस हे १८ हजार ५१०  फूट उंचीचे सर्वोच्च शिखर सर करत नावाला साजेसे कार्य केले आहे.

विद्याधर अनास्कार म्हणाले, धैर्याबरोबरच तिच्या आई-वडिलांचेही कौतुक व्हायला हवे कारण त्यांनी अतिशय कठीण परिस्थितीला सामोरे जात मुलीलाच्या निर्णयाला पाठींबा दर्शविला. हार न मानण्याची वृत्ती आणि जिद्द असेल तरच यशाचे शिखर गाठता येते, हे धैर्या हिने प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे. अनास्कर यांनी धैर्या हिला २१ हजार रुपयांचा धनादेश बक्षीस म्हणून दिला.

सत्काराला उत्तर देताना धैर्या कुलकर्णी म्हणाली, आईची शिस्त आणि वडिलांच्या पाठींब्यामुळे मी हे यश मिळवू शकले आहे. लहानपणापासूनच गिर्यारोहणाची आवड होती. सह्याद्रीतील अनेक गडकिल्ल्यांवर भ्रमंती केली आहे. निसर्गाचे जसे आकर्षण आहे तसेच पांढऱ्या डोंगराचेही आहे. प्रतिकुलतेवर मात करत यश गाठले आहे. पुण्यात सत्कार होत आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे.

विनोद कुलकर्णी म्हणाले, धैर्याच्या यशात तिच्या आईचा सिंहाचा वाटा आहे, हे सांगण्यात मला अभिमानच वाटतो. लहान वयात धैर्याला जो मानसन्मान मिळत आहे हा आई-वडिल म्हणून आमच्यासाठी भाग्ययोगच आहे. प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर यांनी पुरस्कारामागील भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि मानपत्राचे वाचन शिल्पा देशपांडे यांनी केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अंबवडे येथे चोरट्याला ग्रामस्थांकडून बेदम चोप
पुढील बातमी
देवाभाऊ फाउंडेशनच्या सातारा लोकसभा समन्वयकपदी सदाशिव नाईक यांची निवड

संबंधित बातम्या