कोरेगाव शहरात भरदिवसा बिबट्याचा वावर; शेळीवर हल्ल्याचा प्रयत्न, शेतकऱ्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने धूम ठोकली

by Team Satara Today | published on : 14 January 2026


कोरेगाव : शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या महादेवनगर, तीळगंगा नदी परिसरातील शिपीचे रान शिवारात भरदिवसा बिबट्याचा वावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास शेतकऱ्यांना बिबट्या प्रत्यक्ष दिसून आला, तर दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास कुमठे व कोरेगाव गावाच्या सरहद्दीवरील ब्रिटिशकालीन धरण परिसरात एका शेतकऱ्याच्या शेळीवर बिबट्याने झडप घातली. मात्र शेतकऱ्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली.

या घटनेमुळे कोरेगाव व कुमठे परिसरात बिबट्याचा सक्रिय वावर असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. भरदिवसा आणि सणाच्या दिवशी बिबट्याचे दर्शन झाल्याने कोरेगावकरांचे धाबे दणाणले आहेत. शिपीचे रान शिवारातील काही शेतकऱ्यांनी या घटनेचे मोबाईलवर व्हिडिओ शूटिंगही केले असल्याचे समजते. माणसांची चाहूल लागताच बिबट्याने शेताच्या दिशेने प्रवेश केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

या घटनेची माहिती शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य किशोर नानासाहेब बर्गे यांना दिल्यानंतर त्यांनी तातडीने कोरेगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रहार जगदाळे यांच्याशी संपर्क साधला. जगदाळे यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वनविभागाच्या सर्वेक्षणात बिबट्याचे स्पष्ट ठसे आढळून आले, मात्र प्रत्यक्ष बिबट्या दिसून आला नसल्याचे स्पष्ट केले.

वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रहार जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली वनरक्षक विजय नरळे, सुनील शेटे, वनपाल दीपक गायकवाड, प्रतिक गायकवाड यांच्यासह वनकर्मचाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी परिसराची सखोल पाहणी केली.

कोरेगाव शहराच्या सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणावर शेती क्षेत्र असून या परिसरात भटकी कुत्री, कोंबड्या, शेळ्या व अन्य पाळीव प्राणी असल्याने नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे. पाळीव प्राणी बंदिस्त गोठ्यात ठेवावेत, गोठ्यात पुरेशी प्रकाशव्यवस्था करावी, तसेच सायंकाळी व रात्री एकट्याने शेतात जाणे टाळावे आणि सकाळी उजाडल्यानंतरच शेतात जावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेच लहान मुलांना संध्याकाळी किंवा पहाटे शेताजवळ एकटे सोडू नये. नैसर्गिक विधीसाठी मुलांना उघड्यावर पाठवू नये, कारण अशा परिस्थितीत बिबट्या त्यांना प्राणी समजण्याची शक्यता असते, असे वनविभागाने स्पष्ट केले आहे.

कोणतीही अडचण किंवा संशयास्पद हालचाल आढळल्यास तातडीने कोरेगाव वनविभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. मनुष्य हा बिबट्याचे भक्ष नसला तरी योग्य सावधगिरी अत्यावश्यक असल्याचे वनविभागाने नमूद केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आजी माजी सैनिकांच्या पोलीस विषयक तक्रारींसाठी संरक्षण समितीची बैठक संपन्न; विविध तक्रारीचा निपटारा
पुढील बातमी
दीडशे वर्षांचा ब्रिटिशकालीन पूल पाडला ना ?

संबंधित बातम्या