सातारा : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हे बुधवार, दि. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेणार असून शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार आहेत.
शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आगमन सकाळी ११ वाजता सैनिक स्कूल, सातारा येथील हेलिपॅडवर होईल. त्यानंतर ते शिवतीर्थ पोवई नाका येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतील आणि शहीद जवान स्मारकास भेट देऊन आदरांजली वाहतील.
यानंतर दुपारी १२ वाजता स्व. यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद सातारा येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री शिंदे मार्गदर्शन करतील तसेच जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून संघटनात्मक आढावा घेतील. दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे जिल्हाधिकारी कार्यालयात विकासकामांचा आढावा घेणार असून पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, पर्यटन प्रकल्प आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी या विषयांवर चर्चा होईल. सर्व शिवसेना, युवासेना व महिला आघाडी पदाधिकाऱ्यांनी मेळाव्यास उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाप्रमुख शेलार यांनी केले आहे.