ज्येष्ठ नागरिक संघांचा डॉल्बी विरोध वाढला

शहरातील पाच ज्येष्ठ नागरिक संघांचे जिल्हा प्रशासनाला पुन्हा निवेदन

by Team Satara Today | published on : 08 August 2025


सातारा : सातारा शहरातील आगामी गणेशोत्सवामध्ये डॉल्बीला बंदीच घातली जावी, यासाठी ज्येष्ठ नागरिक संघांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शुक्रवारी सातार्‍यातील पाच ज्येष्ठ नागरिक संघाच्या सुमारे 50 सदस्यांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदन सादर करत जिल्ह्यात डॉल्बी बंदीचा आग्रह धरला.
कैलासवासी डॉक्टर कर्मवीर मार्तंडराव सूर्यवंशी चर्चा फाउंडेशन सातारा, शाहूनगर जेष्ठ नागरिक संस्था सातारा, अजिंक्य ज्येष्ठ नागरिक संघ विलासपूर गोडोली सातारा, पूर्वा ज्येष्ठ नागरिक संघ सातारा, समता जेष्ठ नागरिक संघ सातारा तसेच ज्येष्ठ नागरिक संघ जगतापवाडी सातारा या ज्येष्ठ नागरिक संघांनी डॉल्बीच्या विरोधात भूमिका घेतली आहे. यावेळी ज्ञानविकास मंडळाचे कार्यवाह प्रसाद चाफेकर, अजिंक्य ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विठ्ठल जाधव, अशोकराव कदम, पांडुरंग बिचकर चाचा फाउंडेशन, सदर बाजार सातारा येथील अध्यक्ष डॉक्टर हेमलता हिरवे, उदय शंकर सूर्यवंशी, डॉक्टर ओंकार हिरवे शाहूनगर, ज्येष्ठ नागरिक संस्थेचे सचिव विश्वासराव देशमुख, अध्यक्ष अर्जुनराव घोरपडे तसेच विविध ज्येष्ठ नागरिक संघाचे 50 पेक्षा अधिक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना भेटून ज्येष्ठ नागरिकांच्या प्रकृतीला अपाय करणार्‍या डॉल्बी यंत्रणेला जिल्ह्यामध्ये बंदी घातली जावी, अशी आग्रही मागणी केली. ही आग्रही मागणी राज्य शासनाला कळवली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.
निवेदनानंतर ज्येष्ठ नागरिक संघाच्या सर्व सदस्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना प्रसाद चाफेकर म्हणाले, लोकप्रतिनिधींनी जेष्ठ नागरिकांच्या भावना लक्षात घ्याव्यात. डॉल्बी यंत्रणेसमोर कोणताही लोकप्रतिनिधी फार वेळ उभा राहू शकत नाही, तर त्या यंत्रणेचा त्रास ज्येष्ठ नागरिकांना होतो. त्यातून वेगवेगळ्या शारीरिक व्याधी उद्भवू शकतात. त्यावेळी उपस्थित होणार्‍या आपत्कालीन परिस्थितीला जबाबदार कोण ? असा प्रश्न त्यांनी केला आहे. यासंदर्भात लोकप्रतिनिधींनी आग्रही भूमिका घेऊन याबाबत तातडीने निर्णय घ्यावा. अन्यथा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दरम्यान सातारा शहरातील जेष्ठ नागरिक संघ निषेध रॅली काढून आपला निषेध व्यक्त करतील, असा इशारा देण्यात आला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गझल हा समजून सादर करण्याचा गायन प्रकार
पुढील बातमी
सातारा जिल्हा पोलिसांना सर्वसाधारण विजेतेपदाचा मान

संबंधित बातम्या