सातारा : सातारा येथील प्रसिद्ध वकील व क्रीडापटू आणि मैत्र जपणारे व्यक्तिमत्व असलेले एडवोकेट राजीव अत्रे (68) यांचे आज सकाळी मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रात्री उशिरा संगम माहुली येथील कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
त्यांच्यामागे त्यांच्या पत्नी नयना, मुलगा डॉ. रोहित, सून डॉ. नेहा व नात असा परिवार आहे. एडवोकेट राजीव अत्रे हे प्रथमपासूनच खेळाची आवड असलेले हौशी क्रीडापटू क्रिकेट, बास्केट बॉल यामध्ये रस असलेले.
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सुरुवातीची काही वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांनी नोकरी सोडून वकिली पेशाला प्रारंभ केला. सातारा इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये काही काळ त्यांनी शिकवण्याचे काम केले.
थिएटर वर्कशॉप या नाट्यसंस्थेचे ते सभासद होते. अनेक नाट्य कलावंतांना व सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांनी मदतीचा हात नेहमीच दिलेला होता. दिलदार व उमद्या स्वभावाचा अशीच त्यांची ओळख होती. अनेक गरीब व हुशार विद्यार्थ्यांना त्यांनी मदत गोळा करून दिली आहे व त्यांचे शिक्षण पूर्ण करून दिलेले आहे.