सातारा : सातारा शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या दोन प्रमुख रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. शाहू चौक ते गोलबाग आणि कोटेश्वर मंदिर ते राधिका रोड या रस्त्यांचे सुशोभीकरण केले जाणार असून येत्या मार्चपर्यंत राजपथ या रस्त्याच्या कामाची निविदा निश्चित काढली जाईल अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. या दोन्ही रस्त्याच्या सुशोभीकरण कामादरम्यान कोणत्याही व्यापाऱ्यांची अडचण होऊ दिली जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
सातारा पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात गुरुवारी आयोजित व्यापाऱ्यांच्या विशेष बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी प्रस्तावित प्रकल्पाचे सादरीकरण केले. पुणे-मुंबईच्या धर्तीवर आधुनिक तंत्रज्ञान वापरून हे रस्ते विकसित केले जाणार असून, त्यात सुसज्ज फूटपाथ, स्ट्रीट लाईट आणि पार्किंगचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
व्यापाऱ्यांनी या बैठकीत पार्किंगची समस्या, फूटपाथची उंची, हॉकर्सचे पुनर्वसन आणि कामाचा कालावधी यावर सविस्तर मते मांडली. व्यापाऱ्यांच्या भावनांची दखल घेत शिवेंद्रसिंहराजे यांनी व्यापाऱ्यांच्या लेखी सूचनांचा अभ्यास करून आराखड्यात आवश्यक बदल करावेत, गोल बागेसमोरील पालिकेच्या जागेचा पार्किंगसाठी वापर करण्याबाबत चाचपणी करावी, कामामुळे व्यवसायावर परिणाम होऊ नये म्हणून नियोजनबद्ध टप्पे पाडावेत अशा सूचना पालिका प्रशासनाला केल्या.
या बैठकीला नगराध्यक्ष अमोल मोहिते, नगरसेवक अविनाश कदम, धनंजय जांभळे यांच्यासह विविध व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी आणि पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
प्रमुख मागण्यांवर सकारात्मक चर्चा...
व्यापाऱ्यांनी प्रामुख्याने दुतर्फा पार्किंग, सीसीटीव्ही यंत्रणा, महिलांसाठी स्वच्छतागृहे आणि कामाचा वेग वाढवून ते लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली. या परिवर्तनासाठी व्यापारी वर्गाने प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही शिवेंद्रसिंहराजे यांनी केले. या विकासकामांमुळे साताऱ्याच्या वैभवात भर पडणार असून शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे.