सातारा : राज्यातील सर्वसामान्य मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी 11 महिन्याचा लढा सुरु असूनही सगेसोयर्यांच्या आरक्षणाबाबत सरकारने कुठलेही पाऊल उचलले नाही. याबाबत येत्या काळात निर्णय न झाल्यास मुंबईत जाऊन जाब विचारणार आहे. तसेच मराठा समाजाची ताकद काय आहे हे आगामी निवडणुकांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात भाजपला दिसेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी आज सातार्यातील पत्रकार परिषदेत दिला.
सातारा जिल्ह्यात सुमारे 85 हजार व राज्यात लाखो कुणबी नोंदी सापडल्याने आर्थिक निकषावर आरक्षणाचा प्रश्नच उदभवत नाही. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी आम्ही सुरुवातीपासून करत आहोत. येत्या 29 ऑगस्टपर्यंत सग्यासोयर्यांचा निर्णय न झाल्यास मराठा समाज थांबणार नाही. सरकारला ही शेवटची संधी असून आरक्षण दिल्यास सत्ताधार्यांना मराठा समाज डोक्यावर घेऊन नाचायलाही कमी करणार नाही. मात्र, भाजपचे देवेंद्र फडणवीस मराठा समाजाच्या विरोधात असल्याचे दिसून येत आहे. आमचा लढा आता आरक्षण घेतल्याशिवाय शांत राहणार नसून फडणवीसांनी आमच्या नादाला लागू नये. अन्यथा त्यांना मराठा समाजाची ताकत दाखवून देऊ, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारसोबत शिवेंद्रसिंहराजेंनी चर्चा केल्यास आनंदच आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे आहे. ते कुणाच्याही माध्यमातून मिळाले तरी चालेल, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरेंना मराठा समाजामुळे वैभव
मराठा समाजातील गोरगरीब जनतेमुळे राज ठाकरे वैभव बघू शकले आहेत. त्याच मराठा समाजाच्या आरक्षणाला राज ठाकरे आडवे येत आहेत. त्यांनी स्वत:ची मते दुसर्यांवर लादू नयेत. मराठा समाजाचा विचार वेगळा असून गाड्या फोडणारा विचार मराठा समाजाचा नाही, असे सांगत मनोज जरांगे यांनी राज ठाकरेंवर जोरदार हल्ला चढविला.पूर्वनियोजित कार्यक्रम होणार
मला शेवटच्या उपोषणामुळे खूप त्रास झाला असून शरीरातून चमका येत आहेत. काल सभा झाल्यानंतर अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने गरगरल्यासारखे झाले. डॉक्टरांनी रात्रभर सलाईन लावल्याने आता तब्येत व्यवस्थित असून पुणे, नगर, नाशिक या ठिकाणी आरक्षणासाठी शांतता रॅली पूर्वनियोजनानुसार निघणार असल्याचे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.