सातारा : इन्फोसिस फाऊंडेशनच्या संस्थापिका आणि राज्यसभेच्या खासदार डॉ. श्रीमती सुधा मूर्ती यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी आज सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा भेट देवून त्यांचे स्वागत केले. संसदेतील पहिल्याच भाषणात खासदार सुधा मूर्ती यांनी महिलांच्या आरोग्य, जागतिक वारसास्थळे, विशेषत: छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील गड, दुर्ग व देशांतर्गत पर्यटन या मुद्द्यांचा उल्लेख केला. त्याबद्दल खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी बोलताना डॉ. सुधा मूर्ती म्हणाल्या की छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय कमी कालावधीत रयतेचे राज्य निर्माण केले. त्यांनी यशाची शिखरे सर केली. महाराजांनी जगाला हेवा वाटावा असे अनेक पराक्रम केले. त्यांनी लोकशाहीचा पाया रचला. त्यांचा इतिहास जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याचे कार्य आपण केले पाहिजे. असेही डॉ. सुधा मूर्ती यांनी सांगितले.
इन्फोसिसच्या माध्यमातून डॉ. नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांनी इन्फोसिस आयटी कंपनी स्थापन करण्यात प्रचंड मेहनत घेतली. त्यामध्ये डॉ.सुधा मूर्तींनी देखील आपले मोलाचे योगदान दिले आहे. या फौंडेशन मार्फत अनेक बेरोजगारांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिलेत. अनेक वंचितांना आपलंसं करून, त्यांच्या आयुष्यात आनंद दिला आहे. इन्फोसिस कंपनीने देशाच्या विकासामध्ये मोलाचे योगदान दिल्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले.
यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात आय. टी. पार्क उभारण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या बरोबर सुरू असलेल्या प्रयत्नांची कल्पना दिली. इन्फोसिसच्या माध्यमातून साताऱ्यात आय. टी. कंपनी सुरू करावी व त्या संदर्भात आवश्यक त्या बाबींची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासित करून इन्फोसिस आय.टी. क्षेत्राशी संबंधित एक केंद्र साताऱ्यात उभारण्याची मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. त्याबाबत सकारात्मक प्रतिसाद देवून आपण योग्य ती मदत करण्याचे आश्वासन डॉ. सुधा मूर्ती यांनी दिले.
त्याच बरोबरच इन्फोसिस फौंडेशनच्या माध्यमातुन देश, विदेशात सुरू असलेले सामाजिक कार्य प्रशंसनीय आहे. त्या माध्यामातून देशाला शाश्वत विकासाची उद्दिष्ट गाठण्यासाठी देशाला मदत होत असल्याचे सांगितले. राजघराण्याच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षण, आरोग्य या गोष्टींसाठी आपण करत असलेल्या प्रयत्नांची कल्पना दिली. राज्य शासनाच्या व जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून स्मार्ट स्कूल व स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रच्या विकासात्मक कार्याची कल्पना त्यांना दिली. त्याच बरोबरच इन्फोसिस फाऊंडेशनच्या माध्यमातुन या प्रयत्नांना जर जोड मिळाली तर विकास कामांना अधिक चालना मिळेल, त्यामुळे इन्फोसिस फौंडेशनने जिल्ह्यात सामाजिक दायित्व निधीच्या माध्यामातून सामाजिक उपक्रम हाती घेण्याची विनंती केली. तसेच साताऱ्याला भेट देण्याचे आमंत्रण खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिले.
यावेळी प्रतापगड प्राधिकरणचे सदस्य चंद्रकांत पाटील, सोमनाथ धुमाळ, छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीचे सदस्य संग्राम बर्गे, ॲड. विनित पाटील, संदीप शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.